✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 26 जानेवारी):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, ब्रम्हपुरी येथील माजी विद्यार्थी समिती तथा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक विकार :कारणे आणि उपाय या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. बि. शशिकांत यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी मन आणि शरीर हे दोन्ही परस्परअवलंबी आहेत, एकात बिघाड झाला तर दुसर्या घटकावर त्याचा निश्चित असा परिणाम होतो आणि आजच्या धकाधकीच्या आणि जिवघेण्या स्पर्धेच्या काळात योग्य वेळीच मानसोपचार आणि औषधोपचार घेऊन मन आणि शरीराचे स्वास्थ्य सुरळीत ठेवावे आणि मानसिक विकारापासून दुर राहावे असे आवाहन केले.
याप्रसंगी उद्घाटनपर भाष्य करताना प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
आपल्या संबोधनात कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बि. शशिकांत यांनी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक विकासासोबतच मानसिक विकास महत्त्वाचा आहे. रस्तोरस्ती फाटक्या तुटक्या कपड्यात फिरणारा आणि निरर्थक बडबड करणारा वेडसर व्यक्ति म्हणजे मानसिक विकाराने ग्रस्त व्यक्ति अशी समाजाची असलेली धारणा बदलायला हवी. आपल्या अवती भवती वावरणारे अनेक व्यक्ति हे मानसिक विकाराने ग्रस्त असू शकतात त्यांना योग्य निदान आणि उपचाराची गरज आहे मात्र हे त्या व्यक्तीने आधी जाणून घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून मानसिक विकाराचे प्रकार, मानसिक विकार तयार होण्याची विविध कारणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक तथा विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. राजेश कोसे यांनी मानले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तथा विद्यार्थी याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली होते.