✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.23जानेवारी):-महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ,भूदान यज्ञ सेवा मंडळ, महाराष्ट्र आणि सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत कु.समीक्षा अखिलेश अग्रवाल ही पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला पवनार आश्रमाचे विश्वस्त डॉ.उल्हास जाजू (वर्धा), राजाभाऊ निलावार, एडवोकेट जयसिंह चव्हाण, भूदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते, प्राचार्य अविनाश शिर्के ही मान्यवर मंडळी व्यासपीठावर विराजमान होती.
येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी कु. समीक्षा अखिलेश अग्रवाल हिने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत ‘आचार्य विनोबांच्या भूदान चळवळीची परिणामकारकता’या विषयावर निबंध लेखन केले होते. तिला या निबंध स्पर्धेत रोख दीड हजार रुपये व ‘अवघी भूमी जगदीशाची’ व ‘सुगंधी माणसं’ हे दोन ग्रंथ प्रोत्साहन प्रथम पुरस्कार स्वरूपात डॉ. उल्हास जाजू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. या निबंध स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.कु.समीक्षा अग्रवाल ही बीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्राचार्य डॉ. गणेश पाटील, प्रा. अंजली पांडे, यासह सर्व प्राध्यापकांनी तिचे कौतुक केले.