Home महाराष्ट्र रयतेच्या राज्यासाठी जिजाऊंचा संघर्ष आजही मार्गदर्शक!

रयतेच्या राज्यासाठी जिजाऊंचा संघर्ष आजही मार्गदर्शक!

155

✒️रामेश्वर तिरमुखे(जालना)मो:-9420705653

जिजाऊ म्हणजे विदर्भाची कन्या,मराठवाड्याची सून, कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीचा परिसर, तर स्वराज्य राजधानी आणि देहत्याग कोकणात.त्यामुळे साक्षात संपूर्ण महाराष्ट्रात कार्य,कर्तृत्व आणि जीवन.

राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला सिंदखेड जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाराणी होते.त्यांना दत्ताजी,अचलोजी, राघोजी आणि बहादुरजी हे भाऊ होते.जिजाऊंनी मराठी, फार्सी,संस्कृत,उर्दू,हिंदी, तेलगू या भाषा अवगत करून घेतल्या. याचबरोबर घोडेस्वारी,तलवारबाजी, राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळाले. इसवीसन 1610 ला वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजी भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह वेरूळ येथे झाला. शहाजीमहाराज हे मालोजी- उमाबाई यांचे पुत्र होत. शहाजींचा जन्म 18 मार्च 1594 रोजी नगर येथे झाला होता.

1)स्वराज्याची प्रेरिका:-
त्या काळात निजामशाही, आदिलशाही,कुतुबशाही,
मोगलशाही यांचेकडे सरदार, जहागीरदार म्हणून अनेक शूरवीर मराठे सरदार सेवेत होते.या शाह्यामध्ये सतत सत्ता-संघर्ष होत असे.अशातच 1620 ला खंडागळेचा हत्ती उधळण्याचे बनावट प्रकरण घडले.त्यात जिजाऊचे सखे मोठे भाऊ दत्ताजी यांना जिजाऊ च्या चुलत दिराने म्हणजेच संभाजी भोसले ने मारले. त्यातूनच लखुजी जाधव यांनी रागाच्या भरात संभाजीवर वार केला,त्यात संभाजी मारले गेले, शहाजीराजे यांच्यावरही तलवारीचा घाव बसला पण ते वाचले.या सत्ता-संघर्षात जाधव-भोसले सह सर्वमराठे सरदार यांचे रक्त सांडत होते.25 जुलै 1629 ला निजामशहाने देवगिरीच्या किल्ल्यात लखुजी जाधव यांची हत्या घडवून आणली. परकीय सत्तेसाठी रक्त मात्र सासरचे आणि माहेरचे सांडत आहे.या सर्व घटनांतून जिजाऊ आणि शहाजी यांनी आपल्या राजकारणाची आणि स्वराज्याची प्रेरणा घेतली.यासाठी जिजाऊंनी नियोजनपूर्वक वाटचाल केली.कारण 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्यावर जन्मलेल्या बाल शिवाजी यांना जाणीवपूर्वक स्वराज्य निर्माण करून “राजा” बनवायचे कठीण उद्धिष्ट ठरविले.कारण त्या काळाच्या रितीनुसार राजा हा महाराणीच्या पोटी जन्म घेत असे,आणि जिजाऊ या शहाजी भोसले या सरदाराच्या पत्नी होत्या.1621ला जिजाऊ यांना संभाजी नावाचा पहिला पुत्र जन्माला.त्यानंतरही चार अपत्ये जन्मली परंतु ते जगले नाहीत.जिजाऊ आणि शहाजी यांनी संभाजी आणि शिवाजी या दोन्ही भावंडांना शास्त्र,शस्त्र,भाषा,भूगोल,राजनीती,विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात निपुण केले होते. जिजाऊनी उद्दिष्टासाठी सतत धाडस,जाणीवपूर्वक संस्कार, कष्ट,सर्वस्वाचा त्याग केला.

2) अंधश्रद्धा नष्ट केली :-
सन 1636 मध्ये शहाजी आणि सुपुत्र संभाजीसह कर्नाटकात गेले.1642 ला जिजाऊ आणि शिवबा पुणे जहागिरीत निवडक मावळे, राजमुद्रासह आले. आदिलशाहचा सरदार मुरार जगदेव याने पुणे उध्वस्त केले होते.त्यावरून गाढवाचा नांगर फिरवून,तेथे 12 फुटी पहार रोवून,फाटकी चप्पल, तुटका झाडू,फाटके वस्त्र टांगून ‘अशुभ’ शापितभूमी जाहीर केली. त्यामुळे याठिकाणी कुणीही राहत नसे.सर्वत्र भयानकता होती. अशा ठिकाणी जिजाऊ यांनी येऊन ती फाटकी चप्पल, झाडू,पहार उपटून फेकली. त्याच भूमीत नांगर फिरवून तिथे “लालमहाल” बांधला. त्या भूमीला शेतीसाठी योग्य बनविले.अंधश्रद्धा आणि धार्मिक पाखंडाला कृतीतून संपविले.लोकांना विश्वास देऊन वस्तीसाठी प्रोत्साहित केले.त्यांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी पुनवडी,आंबवाडी हे धरणे बांधले.अनेक किल्ले बांधले पण एकाही किल्ले बांधकामानंतर वास्तूपूजा किंवा सत्यनारायण केला नाही! की लिंबू -मिरची, काळी बाहुली लटकविली नाही.

1645ला बाल शिवबा याने अठरापगड जातीच्या मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. जिजाऊ स्वतः शिवबाप्रमाणे पुणे परिसरात गाव वस्ती, पाडे येथे जाऊन लोकांच्या सुख दुःखात सहभागी होत होत्या.त्यांचे राहणीमान साधे होते.तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याची डागडुजी करीत असताना सुवर्णमुद्रा आणि सुवर्णमुर्त्या सापडल्या. सुवर्ण मुद्रा खर्च करता येत होत्या,पण सुवर्णमूर्तीचं काय करायाचं?असा प्रश्न शिवबानं जिजाऊंना विचारला!तेव्हा देवी देवतांच्या मूर्तीपेक्षा स्वराज्य उभं करण्यासाठी पैसा गरजेचा आहे,त्यामुळे सुवर्णमूर्ती वितळवून त्याचा पैसा रयतेच्या कामी लावला!…आज जिजाऊशिवबाचा वारसा सांगणारे आम्ही तर दगडी, संगमरवरी,पितळी,चांदीच्या आणि सोन्याच्या मूर्तीसाठी अट्टहास करतांना विरुद्ध तर वागत नाहीत ना!

रयतेसह महिलांना न्याय:-
स्वराज्यात असणाऱ्या रांझा गावच्या पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटली,त्यामुळे अपमानित मुलीने आत्महत्या केली.तो मृतदेह घेऊन तिच्या वडिलांनी शिवबाकडे न्याय मागितला, त्यावेळी जिजाऊ स्वतः पुढे होऊन कठोर शासन करण्यासाठी पुढे झाल्या.कामांध पाटलाचे हात पाय कलम करण्यात आले. यातून रयतेस खूप मोठा संदेश गेला.स्वराज्यासाठी आपलेपणा आणि चुकीच्या कृत्यापासून सावधानता आली.याच बरोबर हिरकणी चा साडी चोळी देऊन सत्कार केला.ज्या बुरुजाला धरून उतरली त्यास ‘हिरकणी बुरुज’ हे नाव दिले.

3)दुःखात सावरणे:-
कर्नाटकातील कनकगिरीच्या युद्धात जेष्ठपुत्र संभाजीस वीरमरण आले.यामुळे जिजाऊंना दुःख झाले.पण दुःखातून सावरून त्यांनी पुन्हा स्वराज्य निर्मितीत शिवबाना मार्गदर्शन चालू ठेवले.अशातच कर्नाटक मधील होदेगिरीच्या जंगलात पती शहाजींचा 23 जानेवारी 1664 ला अपघाती मृत्यू झाला.प्रचंड दुःखाचा प्रसंग. परंतु यातून सावरून जिजाऊंनी स्वराज्यासाठी आपली गरज आहे.त्या ‘सती’ गेल्या नाहीत.त्यांनी हे सर्व दुःख रयतेच्या राज्यासाठी पचवले.भाऊ,दीर,वडील,भाचे यांच्या हत्या,चार अपत्ये यांचा मृत्यू,मुलगा संभाजी, पती शहाजीराजे यांचा मृत्यू हे सर्व दुःख पचवले.

4) कणखरपणा:-
जिजाऊंचा अनेक प्रसंगी बाणेदारपणा कणखरपणा, मृदुलता प्रत्ययी येते.पुरंदरला सिद्धीजोहरचा वेढा आणि रायगडाला औरंगजेबाचा वेढा या प्रसंगात स्वतःहाती तलवार घेऊन घोडेस्वारीची तयारी करतात.शिवाजीमहाराज आणि युवराज शंभूराजे आग्रा येथे कैदेत असतांना माँसाहेब स्वराज्याचा राज्यकारभार पाहतात. तर 10 नोव्हें 1659 ला अफजलखान भेटीपूर्वी शिवबा जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी येतात, त्यावेळी आशीर्वादपर बोलतात,”शिवबा,अफजलखानाच्या भेटप्रसंगी तुम्ही यशस्वी होणारच आहात,पण जर तुम्ही कामी आलात तरी भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळ शंभुला छत्रपती बनवून स्वराज्याची वाटचाल सुरू ठेवील!”अफजलखान वधानंतर त्याचे शीर संभाजी कावजी राजमाता जिजाऊ यांच्याकडे पाठवितात.त्यावेळी माँसाहेब शिवबाना कळवितात खान दुश्मन होता, तसेच तो सरदारही होता.वध झाला,वैर संपले.त्याचं इतमात दफन करा.त्यामुळेच अफजलखान समाधी,त्यासाठी 2 मन तेल,मुजावर नेमला गेला होता.

5)धार्मिक सहिष्णुता:-
बजाजी निंबाळकर पाच वर्षानंतर पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी तसेच नेताजी पालकर (महंमद कुलीखान) 8 वर्षानंतर स्वधर्मात येण्यासाठी धडपड करीत असतात.त्यावेळी पुरोगामी जिजाऊ सनातनी विरोधाला न जुमानता स्वधर्मात घेतात. त्यांच्यासोबत नातेजोडून सन्मानाची वागणूक देतात.युवराज शंभू यांच्या दुधआईची सोय,त्यांचे शिक्षण संस्कार करण्याचे कार्यही जिजाऊ मासाहेबांनी केले.तानाजी मालुसरे कामी आल्यानंत रायबाच्या लग्नात जातीने जिजाऊ उमरठे गावी हजर होत्या.रयतेची आणि स्वराज्यातील सैनिकांची माँसाहेब काळजी घेत.

6)राज्याभिषेक सोहळा:-महाराष्ट्रातील सनातनी भटांनी राज्याभिषेकाला प्रखर विरोध केला.त्यावेळी शिवबाच्या सोबत खंबीरपणे ठाम राहून तयारी करवून घेतांना काशीहून गागाभट आणून सोहळा 6 जून 1674 ला पार पाडतात. यावेळी जिजाऊ शिवबाना आशीर्वाद देतांना म्हणतात,”आता छत्रपती झालात. तुमच्या पंखात गरुडाचे बळ येऊ द्यात.रयतेचे माता पिता व्हा.युवराज शंभू कडे विशेष लक्ष ठेवा.स्वतःची काळजी घ्या.”.. स्वराज्य निर्माण झाले आहे.रयत सुखी आहे,कर्तव्य संपले आहे.

17 जून 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील राजवाड्यात माँसाहेब अंतिम श्वास घेतात. शिवबाच्या 50 वर्षाच्या आयुष्यातील(1630ते1680जडणघडणीत माँसाहेब जिजाऊ सतत 44 वर्ष सोबत राहून मार्ग दाखवितात.म्हणून तर स्वराज्य निर्माण झाले, दोन छत्रपती घडविले.आम्ही वारसा सांगणारे तरुण आज आमच्या आई वडिलांना हा सन्मान देत आहोत काय?आमची शहरातील आई,मम्मी टी.व्ही.सिरीयलचा रिमोट, मोबाईलच्या चॅटिंग आणि बुवा,बापू,कापू त्यांचे व्रत-उपवास यातून बाहेर पडून कधीतरी हा वारसा पाहिलं काय? शिवनेरी रायगड,दुर्ग जाईल काय! जिजाऊ- शिवबा-शंभू चरित्र वाचून,पाहून समजून घेईल काय!आम्ही तर मावळे म्हणून घेणारे इतके षंढ आणि थंड झालो आहोत की ब मो पुरंदरे सारखे ‘जाणताराजा’ नाटकाच्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊंचा अपमान करीत आहेत.त्यांचा निषेध करण्याऐवजी सरकारने ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करीत,ब मो च्या खाजगी मालकीच्या शिवशृष्टीसाठी सरकारी तिजोरीतून करोडो रुपये दिले आहेत. उद्याच्या आमच्या पिढ्यांनी आम्हाला ‘ना’ लायक ठरवू नये!यासाठी जागृत व्हा..

ज्या गडावर जिजाऊ शिवरायांच्या स्पर्शाने माती पवित्र झाली,त्या किल्ले, गडाला दुर्लक्षित केले जात आहे.जिजाऊ शिवबा यांचे दैवतीकरण करून कर्तृत्व नष्ट केल्या जात आहे…!तरीही सामाजिक आणि व्यवस्था परिवर्तनासाठी समर्पित संघटना आणि त्यांची कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक वडील बांधव-बहिणी ‘जयजिजाऊ’ असे अभिवादन करीत आहेत.सत्यशोधक,शिवधर्म पध्दतीने,विनाकर्मकांड, पाखंडविरहीत जीवनव्यवहार करत आहे.आज गावोगावी होणाऱ्या सप्ताहात जिजाऊ- सावित्रीमाई-अहिल्यामाई शिवबा-शंभू-ज्योतिबा-शाहू महाराज यांचे चरित्र वाचन-पारायणे व्हावीत,त्यांची चरित्र पुस्तकांची घरी आवश्यकता आहे,असे वाटते. यासाठी आपण साथ सहयोग कराल ही आशा आणि विश्वास बाळगून थांबतो..जय जिजाऊ जय शिवराय..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here