🔸सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया केली सुरू
🔹पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.26डिसेंबर):- शहराचा शैक्षणिक मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूलचे नूतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याच ज्युबिली हायस्कुलचे विद्यार्थी. 1906 मध्ये स्थापना झालेल्या या शाळेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक कृपाहल्ली सितारामय्या सुदर्शन उपाख्य सुदर्शनजी ,माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांतारामजी पोटदुखे यांच्यासारखे मान्यवर याच शाळेचे विद्यार्थी होते. एकेकाळी शैक्षणिक वैभवाची साक्षीदार असलेली ही शाळा आज ओसाड पडत चालली आहे. या शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हे मैदान पुर्ववत करण्याची या शाळेचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता लक्षात घेत अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार यांनी ज्युबिली हायस्कुलच्या नूतनीकरणासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. 11 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार हा निधी त्यांनी मंजूर केला.
या नूतनीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. आता ज्युबिली हायस्कुलचे नुतनीकरण करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने होवू घातलेल्या या नूतनीकरणाच्या कामाच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्हयाच्या शैक्षणिक क्षेत्राचा मानबिंदू समजल्या जाणा-या ज्युबिली हायस्कुलला गतवैभव प्राप्त होणार आहे. ज्युबिली हायस्कुलच्या नुतनीकरणामध्ये दरवाजे, खिडक्यांची दुरूस्ती, नविन फलोरींग करणे, नविन छत व फॉल सिलींग करणे, आवश्यक ठिकाणी प्लॉस्टर करणे व रंगरंगोटी करणे, ऑकोस्टीक सिलींग, पुरूष व स्त्रीयांकरीता स्वतंत्र शौचालयाचे बांधकाम करणे, डिजीटल क्लासरूम व आधुनिक फर्नीचर, अत्याधुनिक प्रयोगशाळेची निर्मिती करणे या कामांचा अंतर्भाव आहे.
एका विद्यालयातून एक विद्यार्थी शिक्षण घेतो, त्या शाळेच्या संस्कारातून त्याची जडणघडण होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात हा विद्यार्थी अग्रेसर ठरतो. या शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने या शाळेचे नुतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेत शाळेचे गतवैभव तिला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे हा भाग आजच्या प्रॅक्टीकल जगात मात्र विरळाच आहे. हा पुढाकार घेणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करावे तेवढेच कमीच आहे.