✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कराड(दि.२४डिसेंबर):-“विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच श्रमप्रतिष्ठा व श्रमसंस्कार, सद्विचार, प्रामाणिकपणा ही नैतिक मुल्ये जोपासण्यासाठी महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. विशेष श्रमसंस्कार शिबिर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा कणा आहे. उज्वल भविष्यासाठी खेड्यांचा शाश्वत विकास होणे काळाची गरज आहे.” असे विचार मौजे तासवडे येथे वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मा.श्री विजय विभूते सहा.गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कराड यांनी मांडले.
श्री विजय विभुते पुढे म्हणाले की,” स्वच्छ व हरित ग्राम ही संकल्पना राबवून गावातील नागरिकांनी मी समृद्ध तर गाव समुद्र हा मंत्र जपून आरोग्यदायी ग्राम, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, जलसमृद्ध ग्राम हे मूलभूत प्रश्न मार्गी लावून गाव खेड्यांची प्रगती करावी. यासाठी हे शिबिरे मोलाची भूमिका बजावीत असतात. यातूनच स्वयंसेवकांनाही गावाशी असलेले नाते जोडता येते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पदवीधर शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मा. अमित जाधव म्हणाले की, “महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ खरा भारत हा खेड्यातच आहे असे सांगितले होते. खेडी समृद्ध झाली तरच देश सुधारेल व देशाच्या नवक्रांतीचे वारे सुरू होतील. देश पातळीवर सामाजिक व सांस्कृतिक एकोपा निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या कर्तुत्वाने राष्ट्रीय सेवा योजनेने आपला ठसा उमटविला आहे. कोविड महामारीत सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका निर्णायक ठरली आहे.”
मा. श्री भानुदास जाधव (संचालक, सह्याद्री सह. साखर कारखाना लि. यशवंतनगर) यांनी या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद भूषविले.यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस .बी. केंगार, वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, तासवडे गावचे सरपंच मा. सौ. भारती पांडुरंग शिंदे, उपसरपंच मा. श्री. सुभाष मारुती जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे यांनी केले. तर शिबिराचा उद्देश कथनराष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी के.एस. महाले यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत करताना शिबिराचा उद्देश कथन केला. प्रा. यू. एस मस्कर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा. एस. बी राठोड यांनी आभार मानले. प्रा. सौ. पी. एस. सादिगले यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचे प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय सेवक व मौजे तासवडे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.