विज्ञानाच्या परिभाषेनुसार सध्याचा माणूस म्हणजे ‘होमो सेपियन’ अर्थात ‘शहाणा माणूस!’ विचार करू शकणारा, विचार करायला लावणारा, बोलणारा, ऐकणारा, बोललेले समजणारा, ऐकून त्याचा अर्थ लावणारा, अर्थाचा बेअर्थ करणारा, अर्थार्थी संबंध-असंबंध अन्वयार्थ लावणारा, स्वतःलाच शहाणा समजणारा, आणि तो शहाणपणा एखादा पुरस्कार मिळाल्याप्रमाणे कळस करून स्वतःच्याच डोक्यावर सजवून मिरवणारा असा ‘बराच शहाणा माणूस’ तो आहे. म्हणजे आजचा माणूस नुसता माणूसच नाही तर तो ‘शहाणा माणूस’ आहे; आणि तो इतका ‘शहाणा’ आहे की त्याच्या खाली जे-जे आहेत म्हणजे बुद्धिमत्तेच्या स्तरावरून त्या प्रत्येक शहाण्या नसणाऱ्यांना, त्यातल्या अर्ध्या- दीड शहाण्यांना स्वतःच्या शहाणपणातून मीच ‘शहाणा’ आहे, हेच तो त्याच्या कृतीतून वारंवार सांगत असतो.
बरे हे इतर प्राण्यांच्या बाबतीत तो शहाणा आहे, हे सांगणे म्हणजे विज्ञानाच्या परिभाषेतून एक त्यातलाच शहाणा माणूस म्हणून मी समजू शकतो; पण तो याच माणसात जर स्वतःलाच शहाणा म्हणत असेल तर काय म्हणायचे? म्हणजे त्याला मिळालेल्या नोकरीनुसार, त्याच्या उच्च विद्याविभूषित असण्यापासून ते त्याने दिलेल्या प्रत्येक कसोटीतून तो जर बुद्धिमान आहे आणि इतर माणसांच्या तुलनेत त्याची कृती ही सर्वश्रेष्ठ असून त्या कृतीतून मिळवलेला त्याचा मोबदला असो की त्याची नोकरी असो की त्याचे उच्च शिक्षण असो तो शहाणा होत असेल तर तो शहाणा म्हणून कबूल करायला काही हरकत नाही; कारण ते शहाणपण एका व्याख्येत बसणारे असल्यामुळे आणि ती व्याख्या विज्ञानाच्या साच्यात बसणारी असल्यामुळे कोणताही शहाणा माणूस त्या व्याख्येला, त्या माणसाच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या शहाणपणाला नाकारू शकत नाही. पण जर त्याची एखादी गोष्ट विज्ञानाच्या परिभाषेत बसणारी नसेल तरी तो माणूस इतरांपेक्षा मीच शहाणा म्हणत असेल तर या ठिकाणी ‘शहाण्या’ या शब्दाला समानार्थी शब्द ‘मूर्ख’ का असू नये?
आता मी माणसाला उगाच ‘वानर’ म्हणत बसलो नाही. अरे ‘माकडा’ऐवजी मी ‘वानर’ शब्द या ठिकाणी वापरला का? नाही तो आपसूकच वापरण्यात आला. कारण मला तो माकडापेक्षाही जास्त घाणेरडा त्याच्या कृतीतून वाटला; म्हणून त्याला ‘वानर’ म्हटले. वानर आणि माकड हे काही वेगळे आहेत असं नाही. फक्त तो(वानर) रंगाने थोडा काळा आहे; हा मला विचाराने काळा वाटला म्हणून वानर थोडे बरे वाटले. बरं,असे काही शीर्षक मी का दिले असेल? मला काहीतरी वेगळे दिसले असेल, काहीतरी उमगले असेल, काहीतरी खटकले असेल, जे माणूस म्हणून त्याच्यामध्ये ते समाविष्ट असू नये असे मला वाटले असेल किंवा जे काही दिसले ते कदाचित माणसापेक्षा माकडामध्ये अधिक शोभून दिसले असते असेही वाटले असेल म्हणून तर वरचे शीर्षक सुचले. उगाच का लिहायचे म्हणून लिहीत बसलो! तसे असते तर खूप आधी लिहिले असते. आजची वेळ, आजचा दिवस या आजच्या वेळेच्या दिवसाच्या आधी, मागे-पुढे घडलेले काही प्रसंग त्याला कारणीभूत असतील ना तेव्हाच तर ते मी लिहित आलोय.
आता या माकड होणाऱ्या शहाण्या माणसाबद्दल त्याच्या नावासहित, त्याचे वेडेवाकडे प्रसंग जे माझ्यासोबत, माझ्यासारख्या अनेकांसोबत त्यांनी जे घडवून आणले हे जर मी सांगत बसलो तर या माकडामधला शहाणपणा जागा होईल आणि तो शहाणपणा नुसता जागा होणार नाही तर पुन्हा त्या शहाणपणाला खाजवल्यासारखं होईल आणि माकडांना खाजवण्याची आणि माणसातील माकडांना खाजवायची जुनी सवय आहे आणि मला उगाच त्यांची खाज घडवून स्वतःची नको ती खाज वाढवून माझं डोकं खाजवत बसायचं नाही आहे. कारण यापूर्वीच या माकडांच्या कृतीतून बराच वैताग आला आहे आणि माकडांना कितीही जरी सांगितले, कितीही दगड-गोटे मारले तरी ती या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायचे थांबवत नाहीत. त्यांचा तो स्वभावच, म्हटलं तर त्यांचे नैमित्तिक काम आहे. तसाच हा माकड होत असलेला माणूस याची टिंगल-टवाळी, त्याची टिंगल-टवाळी, याची लावा-लावी का सोडत नाही? ते म्हणतात न ‘बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल।
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरल।।’ हा माणूस होमो सेपियन होऊ द्या की होमो सेपियन सेपियन की आणखी काही हजार सेपियन्स त्यातला माकडपणा काही जायला तयार नाही. ज्यांना समजले त्यांना इशारा पुरेसा आहे आणि ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माकड राहिलेलेच बरे! कारण त्यांचीच ती आवड आणि निवड आहे.
माणूस सुरुवातीला एकटा राहायचा नंतर टोळी करून राहू लागला. टोळीची कधी घरटी झाली, घरट्यांचे गाव, गावांची शहरे, शहरांमध्ये गल्ल्या- सोसायट्या कधी वाढत गेल्या कळलेच नाही. पण याच सो कॉल्ड सुशिक्षित म्हणवल्या गेलेल्या सोसायटीमध्ये ज्यावेळेस पुन्हा गट होऊन तेच गट टोळ्या होऊ लागल्या; टोळ्या कधी फुटू लागल्या तर कधी एकत्र येऊ लागल्या. आपापल्या समजप्रमाणे समज, नासमजाची कधी जोड झाली, कधी नासमज समजासोबत जोडला गेला, कधी कोण कुठे फेकला गेला, कधी कोण एकटा झाला हे तरी कुठे कळले!
कुठलीही सोसायटी उगाच मोठे मोठे नाव दिल्याने, फॉरेनच्या लेबलची पाटी इकडे आणून टांगल्याने, टोलेजंग इमारतीने, मोठं-मोठ्या रुंद रस्त्याने, चकचकीत रंगरंगोटीने, झगमगण्याने, उंच उंच झाडाच्या उंचीने ती सोसायटी होत नाही. ‘वस्ती’ निश्चितच होऊ शकेल. पण सोसायटी नाही. सोसायटी म्हणजे काय? ‘सोसायटी’ हा इंग्रजी शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ ‘समाज’ आणि समाज हा माणसांनी बनत असतो आणि माणसे ही विचाराने, त्यांच्यातल्या सुविचाराने एकत्र राहण्याने, एकोप्याने वागण्याने, सहकार्याने, सहविचाराने, सामंजस्याने, माणुसकीने, एकमेकांबद्दल असलेल्या आपुलकीने, सहचर्याने होत असतात आणि यातील एक किंवा बरेच गुण जर त्या सोसायटीत नसतील तर ती बकाल वस्तीच! कशाला! सोसायटी म्हणता; आणि ‘सोसायटी’ या नावाला शोभिवंत करण्यापेक्षा त्याला नाशवंत तरी का करता? प्रत्येकाला टीव्हीतल्या ‘गोकुलधाम सोसायटी’ सारखी सोसायटी स्वप्नवत असावी वाटते; पण त्या गोकुलधाम सोसायटीमधील माणसे आपण होऊन आपल्याच सोसायटीला ‘गोकुलधाम’ का करू नये? बाहेर मोठ्या फुशारकीने सांगायचे, मी या सोसायटीत राहतो, मी त्या सोसायटीत राहतो आणि एका घाणेरड्या, विस्कटलेल्या, हातातून निसटलेल्या सोसायटीची ब्रॅण्डिंग करायची लाज कशी नाही वाटत? निर्लज्ज आहोत हे सन्मानाने सांगता!
जेव्हा असे सुंदर-सुंदर ऐकून काही भाबडी माणसे त्या सोसायटीतील कलाने त्यामधील झगमगाटाने जेव्हा इकडे कलतात आणि जेव्हा त्याच माणसाच्या खपली पडलेल्या डोक्यामधला घट्ट काळोख तिथल्या उजेडातही रोज दिसतो तेव्हा हीच माणसे जर तुमच्या सोसायटीला जंगलातली गुहा म्हणून जात असतील तर ती लाजिरवाणी बाब नाही का?
मी या माणसाला माकड म्हणून त्या माकडाला तरी कमी काय म्हणून कमी लेखू? त्याची तरी त्याच्या वस्तीमधल्या सवंगड्यांत असलेली किंमत का म्हणून कमी करु. निदान ही माकडे टोळी करून तरी राहतात. टोळी करून आपसात एकोप्यात राहतात. कदाचित प्राणी म्हणून तेही भांडत असतील पण त्यांची टोळी कधी फुटलेली पाहण्यात आलेले नाही. पण आमच्या टोळ्या रोज बनतात, बिघडतात, नवीन तयार होतात. तयार झालेल्या तुटतात. एका टोळीत चार टोळ्या होतात आणि हे गट-तट गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत गेले; सगळे सोयीनुसार! एरवी आपण राजकारण्यांना म्हणतो की ते कोणत्याही पक्षात जातात. कधीही फुटतात. त्यांचा काही विचार नसतो. सामान्य माणूस म्हणून आपला तरी कुठला विचार आहे.
विचार जसा मोठ्या माणसांना असतो तसा सामान्यातल्या सामान्य माणसाला स्वतःचा विचार असायला हवा आणि तोच स्वतःचा विचार त्याला असामान्यत्वापर्यंत पोहचवू शकेल. पण एक विचार करणारा प्राणी म्हणून आपण कधी तो विचार केलाच नाही आणि केला तरी आपल्या सोयीप्रमाणे केला आणि आपल्या विचारानुसार लोक बदलतात हा विचार केला आणि हा विचार का केला कारण लोकही लोकांच्या विचाराप्रमाणे बदलायला लागलीत म्हणूनच. माणूस विचार करणारा प्राणी असून त्यातलाच काही भाग विचार करणे सोडून गेला आणि लोकांच्या विचारांप्रमाणे वागायला लागला म्हणून नवीन व्याख्या अशी होऊ शकेल- काही माणसे विचार करणारी आहेत; काही माणसे इतरांचा विचार करणारी आहेत आणि काही माणसे विचार करणाऱ्या माणसाला उगाच विचार करायला लावणारी आहेत आणि या समाजामधील या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारी माणसे म्हणजे लोकांचा विचार आपल्या आचरणात आणणारी होत.
जो कुविचारी आहे तो या माकडातला ‘टोळक्या’ म्हणजे लोकांना उगाच विचार करायला लावणारी माणसे होत. या दोन्ही प्रकारची माणसे खऱ्या माणसाच्या समाजासाठी घातक आहेत. जी माणसाला माकडापर्यंत नेऊन सोडत आहेत. ही माणसे बदलतील न बदलतील ही त्यांची प्रवृत्ती ठरवेल. पण यांच्या म्हणण्यानुसार वागून आपण ‘माकड’ होत असेल तर कृपया स्वतःला माणसे म्हणणे सोडून द्या!
✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते, नांदेड )मो:-8806721206