✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.22 डिसेंबर):-मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे एका निष्ठावान कार्यकर्तीला आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुक्ता टिळक गेले काही महिने गंभीर आजाराशी झुंजत होत्या. त्याही परिस्थितीत त्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसाठी स्ट्रेचरवरून उपस्थित राहिल्या होत्या, असे सांगून श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की मुक्ताताईंनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील सून म्हणून वावरतांना जनसेवेचा आणि जनजागरणाचा लोकमान्यांचा वसा त्यांनी पुढे चालविला.
भाजपाचे काम करतांना त्यांचे सेवाव्रती व्यक्तिमत्व बहरून आले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी आपला ठसा जसा उमटवला तसेच कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार म्हणून मिळालेल्या अल्पकाळातही त्यांनी आपले नाव जनमानसात कोरले. कोरोना काळात आणि त्यापूर्वी त्यांनी केलेली जनसेवा पुणेकर आणि भाजपा कार्यकर्ते विसरणार नाहीत.
आम्ही टिळक कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मुक्ताताईंना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवार व कार्यकर्त्यांना या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे