✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.21डिसेंबर):- महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे अकोला महानगर पालिकेतील कार्यरत एकुण ५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाणुन बुजुन निराधार आरोप ठेवून महानगर पालिका प्रशासनाने नरेश मुर्ती,शरद ताले, किशोर सोनटक्के, प्रकाश फुलउंबरकर आणि महिला कर्मचारी सुनिता चरकोल यांना नियमबाह्य पद्धतीने बडतर्फ केले होते.बडतर्फीची कार्यवाही मागे घेऊन त्यांना पुर्ववत पुर्वलक्षी प्रभावाने कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे यशवंत स्टेडियम नागपूर येथे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाने यांची दखल घेऊन बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्याध्यक्ष राजकुमार जवादे यांना शिष्टमंडळ घेऊन चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आणि महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभुराज देसाई यांच्या रविभवन येथील दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली आणि मंत्री महोदयांनी फेरचौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला त्यांनी दिले.शिष्टमंडळात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव पी.एच.गवई, महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्रा शेषराव रोकडे, राज्याचे संघटक सिद्धार्थ सुमन, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय शिडाम, अकोला येथील अन्यायग्रस्त शिक्षक नरेश मुर्ती इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते