✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.17डिसेंबर):- नागपूर येथे 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी नियोजन सभागृह येथे सर्व यंत्रणाकडून जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेतला. यंत्रणानी प्रलबिंत कांमाना गती देऊन निधी मार्चअखेर खर्च करण्याचे निर्देश दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम., चिमूरचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी म्हणाले, प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करतांना लागणारी कागदपत्रे परिपूर्ण असावीत. आयपास प्रणालीमध्ये प्रस्ताव पाठवितांना अंदाजपत्रक, जागेची उपलब्धता व इतर अनुषंगिक बाबी तपासूनच मान्यतेसाठी पाठवावेत. तसेच दायित्व मागणी करतांना प्रशासकीय मान्यता, कार्यादेश व काम पुर्ण झाल्याचे छायाचित्र आयपास प्रणालीवर अपलोड करावे. प्रशासकीय मान्यता, कार्यादेश व इतर अनुषंगिक कामे त्वरित पूर्ण करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
प्रलंबित कांमाना गती देवून संबधित विभागांनी सदर निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा यासाठी योग्य नियोजन करावे. निधी खर्ची होत नसल्यास विहीत वेळेत समर्पित करावा. जेणेकरुन, इतर विभांगाना निधी उपलब्ध करुन देता येईल.केंद्र शासनाच्या 13 फ्लॅगशिप योजनेसंदर्भातील माहिती मागितल्यास उपलब्ध करुन देता येईल यासाठी माहिती अद्ययावत ठेवावी. फ्लॅगशिप योजनेतंर्गत कामे झाली असल्यास त्या कामाचे फोटो पाठवावेत.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, डिपीसीची मंजूरी आयपासवरुन दिल्या जात असल्याने विभागांनी आयपासवर प्रस्ताव पाठविल्याची खात्री करावी. तसेच यंत्रणाना आयपास प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. अनुपालन अहवाल सादर करतांना संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन संबंधित विषयावर काय कार्यवाही केली याची माहिती सांगावी. अधिवेशन काळात अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावेत.अशा सुचना दिल्या.
तत्पूर्वी 17 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुपालन विषयांवर चर्चा करण्यात आली.