🔸ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.17डिसेंबर):- जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. काेठेही गडबड, गोंधळ हाेऊ नये यासाठी अशा लाेकांवर पाेलिसांचे लक्ष राहणार आहे.बीड जिल्ह्यात तब्बल तीन हजार पाचशे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी राहणार आहे. यामध्ये दाेनशे पेक्षा जास्त अधिकारीही रस्त्यावर उतरणार आहेत.
बीड जिल्ह्यात सातशे चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवार) मतदान होत आहे. त्यासाठी बंदोबस्ताची योजना निश्चित करून यादी संबंधित पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीला परजिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला आहे.आज नेमलेल्या ठिकाणी ईव्हीएमसह अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताच्या कामी जावे लागणार आहे. दरम्यान उद्या मतदान होऊन ईव्हीएम मतमोजणी केंद्राच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोच होईपर्यंत पोलिसांना तैनात रहावे लागणार आहे.
दरम्यान पाेलिस दल गावा गावात रूट मार्च काढून शांततेत मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे. बीडच्या दहिफळ वडमाऊली येथे केज पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. दरम्यान यावेळी शांततेत मतदान करा, दबाव, दहशत आणि चुकीचा प्रकार सहन केला जाणार नाही. प्रशासनाचे सर्व हालचालीवर लक्ष आहे. असाच संदेश या माध्यमातून देण्यात आला.