🔺सोने – चांदीसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि.16 डिसेंबर):-घरातील मंडळी लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेलेली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दि. 13 डिसेंबरचे रात्री घराचा दरवाजा तोडून 50 तोळे सोने, अडीच किलो चांदी व रोख 80 हजार रुपये अशा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उमरखेड बस स्टँड समोरील हरीओम संकुल बिल्डींग मध्ये घडली.
कैलास हरिभाऊ शिंदे हे लग्न कार्या निमित्ताने परिवारासह माहुर येथे दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास गेले होते. ते 14 डिसेंबर रात्री 9:30 वाजताचे सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला व घरातील कपाट फोडलेले तसेच सामान अस्ताव्यस्त केलेले दिसले.
मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नुकतेच खरेदी केलेले 50 तोळे सोने व अडीच किलो चांदी व रोख 80 हजार रुपये असा एकंदरित 28 लाख रुपयांचा ऐवज दि . 13 डिसेंबरचे रात्री कींवा दि .14 च्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याचे कैलास शिंदे यांनी घरात प्रवेश केल्यानंतर निदर्शनास आले.हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर घटनेची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला दिली.
पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून यवतमाळ ठसे तज्ञांना पाचारण केले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील रात्रंदिवस गजबजलेल्या व पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्टँड परिसरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत.