✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी
बीड(दि.15डिसेंबर):-आपल्या अमोघ वक्तृत्व कौशल्यासह अभ्यासू वृत्ती व गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारे गेवराई तालुक्यातिल आहेर वाहेगाव या गावचे भूमिपुत्र राहुल गिरी यांना छत्रपती उद्योग समूहाचा अतिशय मानाचा ‘गेवराई भूषण-२०२२’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
छत्रपती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष भंडारी यांच्या माध्यमातून छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेच्या वर्धापनदिनानिमीत्त प्रतिवर्षी छत्रपती फेस्टीव्हलचे अतिशय थाटात आयोजन करण्यात येत असते. यादरम्यान मानाचा गेवराई भूषण पुरस्कार वितरण सोहळा व वैचारिक आणि मनोरंजनात्मक भव्य कार्यक्रम समाविष्ट असतात. अनेक दिग्गज विचारवंत, कलाकार मंडळी व इत्यादिंच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असतो.
छत्रपती फेस्टीव्ह हा गेवराई तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला वलय प्राप्त करून देणारा महोत्सव आहे. यावर्षी ८ व्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजित ‘छत्रपती फेस्टीव्हल-२०२२’ दरम्यान होम मिनिस्टर हा अतिशय गाजलेला कार्यक्रम संपन्न होत असून हवामान तज्ञ पंजाबराव डख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे.
यंदाचा गेवराई भूषण पुरस्कार अनेक राज्य व राष्ट्रीय भाषण स्पर्धांचे विजेते, नामांकित वक्ते व युवा अभ्यासक राहुल गिरी यांना प्रदान केला जात आहे. अतिशय कमी वयात देशाच्या संसदेपर्यंत मजल मारुन राज्याचे नेतृत्व दिल्लीत करण्याची किमया साधणारे राहुल गिरी हे बीडवासियांचा अभिमान आहेत. नवतरूणांसाठी ते प्रेरक आहेत. या पुरस्काराच्या घोषणेनंतर त्यांचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.
येत्या १७ डिसेंबर रोजी गेवराई येथिल कन्या प्रशाला येथे सायं. ठीक ६:०० वाजता संपन्न होणा-या कार्यक्रमादरम्यान या पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन संतोष भंडारी यांच्या वतीने केले जात आहे.