Home गडचिरोली महाराष्ट्राच्या मातीतला एक सर्कस विदुषक!

महाराष्ट्राच्या मातीतला एक सर्कस विदुषक!

171

(बंडोपंत देवल स्मृतीदिन विशेष)

महाराष्ट्राच्या मातीतसुद्धा एक असा विदुषक होऊन गेला, जो सर्कशीत लोकांचे मनोरंजन करायचा. हा विदुषक कोणत्याही सिनेमातला नाही, तर खऱ्या आयुष्यातला होता. या विदुषकाची कीर्ती केवळ महाराष्ट्रभरच नाही तर संपूर्ण जगभर पसरली होती. या विदूषकाचे नाव बंडोपंत देवल उर्फ सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम असे होते. त्यांच्या स्मृती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखातून उजाळा देण्याचा हा प्रयत्न… संपादक.

भारत देश जेव्हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा युरोप देशातल्या अनेक सर्कस कंपन्या भारतात येऊन खेळ सादर करत. जसे दादासाहेब फाळके यांनी ब्रिटीश सिनेमे पाहून सिनेमा बनवण्याचा ध्यास घेतला. तसेच पाश्चात्य देशांची सर्कस कला बघून भारतीयांची सुध्दा एक सर्कस असावी, असा विचार एका मराठी माणसाने केला. त्यांचे नाव विष्णुपंत छत्रे होते. त्यांनी सन १८७८ साली सांगली येथे अस्सल भारतीय पद्धतीची छत्रे सर्कस निर्माण केली. विष्णुपंत स्वतः उत्कृष्ट घोडेस्वार होते. त्यामुळे तेथे ते घोड्यांच्या सहाय्याने खेळ करणे, निरनिराळे स्टंट करणे, अशा अनेक गोष्टी अगदी कुशलतेने करायचे. सन १८८४ साली त्यांनी अनेक युरोपीय सर्कसपटू आपल्या सर्कशीत घेतले. यानंतर त्यांनी ग्रँड इंडीयन सर्कस असे नाव सर्कशीला दिले आणि ही सर्कस घेऊन त्यांनी भारतभर तसेच परदेशात दौरे काढले.

त्याकाळी विष्णुपंत छत्रे हा मराठी माणूस सर्कशीच्या माध्यमातून ब्रिटिशांना न जुमानता सर्वत्र प्रयोग करत होता. त्यांची सर्कस मोठी होत गेली. परंतु त्यांच्या सर्कशीमध्ये काम करणाऱ्या माणसांनी स्वतःची एक वेगळी सर्कस काढली. छत्रे सर्कशीत नाव मिळवलेले मिरज म्हैशाळचे बाबासाहेब देवल यांनी आपल्या भावांसोबत सन १८९५ साली स्वतःची नवी सर्कस काढली. मिरजेच्या जोकरमुळे भारतातली सर्कस परदेशी भूमीवर धुमाकूळ घालू लागली. विदूषक किंवा जोकरचे खूप आकर्षण जनमनात होते. हॉलिवूडचा दि डार्क नाईट मधला जोकर तर अजूनही मनातून कधीकधी डोकावतो. जेव्हा लक्ष्याचा एक होता विदुषक पाहण्यात आला, तेव्हा विदुषकाच्या मुखावट्यामागे हसऱ्या चेहऱ्या पलिकडे एक वेगळे आणि काहीसे वेगळे जीवन दडलेले आहे, याची जाणीव झाली. अलीकडेच जोकर हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा परिस्थितीने दिलेल्या अफाट दुःखातून माणसाचा जोकर कसा होतो, हे अनुभवायला मिळाले.

सर्कशीचा इतिहास तसा फार जुना आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत सर्कस सर्वप्रथम सुरू झाली, असे मानतात. त्याकाळी सर्कशीचे प्रमुख आकर्षण म्हणजे घोड्यांवर बसून होणारे अनेक प्रकारचे खेळ आणि प्राण्यांचे सामने हे होय. त्यामुळे सर्कस पाहणे ही उपस्थित लोकांसाठी एक पर्वणीच असायची. हळूहळू सर्कशीचे स्वरूप बदलत गेले तरीही सर्कसमध्ये या प्रमुख गोष्टी हमखास असायच्या. पारंपरिक सर्कशीची परंपरा थोडी लोप पावून आधुनिक काळानुसार सर्कस बदलली. फिलिप अॅस्टली या परदेशी घोडेस्वाराने इ.स.१७४२ साली आधुनिक सर्कशीला सुरुवात केली. अशाप्रकारे सर्कस फोफावत गेली आणि सर्कस कलेचा जगभरात विस्तार होत गेला.

मोठ्या मनाच्या विष्णुपंतांनी बाबासाहेबांना सांगितले की नवीन सर्कस काढतोयस तर आपल्या सर्कसचा जुना तंबू घेऊन जा. अशा तऱ्हेने छत्रे सर्कसचा जुना तंबू घेऊन नवीन देवल सर्कसची सुरुवात झाली. सर्कसच्या सुरुवातीला बाबसाहेबांबरोबर होते धाकटे तिन्ही बंधू आणि म्हैसाळमधील सवंगडी. खरंतर बाबासाहेब सोडले तर इतर सर्व लोकांना सर्कस मधील कोणतीच कला अवगत नव्हती. पण अवघ्या काही दिवसांतच या लोकांमधूनच विविध खेळ दाखवणाऱ्या कलाकारांचा संच बाबासाहेबांनी तयार करून दाखवला. देवल सर्कस या नावाने ही सर्कस त्यावेळी सर्वत्र प्रसिद्ध झाली. पुढे ग्रेट इंडियन सर्कस म्हणून या सर्कसची जगभरात ख्याती झाली. भव्य दिव्य तामझाम, चित्तथरारक खेळ, सफाईदार कसरती, अशी या सर्कशीची वैशिष्ट्य होती. या सर्कशीचे प्रमुख आकर्षण म्हणजे काशिनाथ सखाराम उर्फ बंडोपंत देवल होते. असे म्हणू शकतो, की बंडोपंत देवल एकट्याच्या जोरावर देवल सर्कस रंजक करायचे. याला कारण असे की त्यांनी रंगवलेला विदुषक होय. बंडोपंत असा फर्मास विदुषक उभा करायचे, की त्यांचा विदुषक पाहायला देवल सर्कसमध्ये गर्दी व्हायची. वयाच्या ११व्या वर्षापासून बंडोपंत सर्कशीत काम करत होते.

त्यांचे काका बाबासाहेब देवल यांच्यापासून त्यांना या कलेतल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी कळून आल्या होत्या. बंडोपंतांनी सिंगापूर, अफगाणिस्तान, मद्रास, मैसूर येथे धूम माजवली होती. ज्याकाळात भारतातल्या इतर सर्कसी बैलगाडीतून प्रवास करायच्या त्याकाळी देवल सर्कस परदेशी भूमीवर धुमाकूळ घालत होती.

बंडोपंत देवल यांच्या विदूषकाचे नाव सर्वदूर पसरले होते. एकदा मिरजेला स्वातंत्र्यवीर सावरकर खास बंडोपंतांना भेटण्यासाठी आले होते. तो काळ मराठी संगीत नाटके आणि सर्कशींसाठी एक सुवर्णकाळ होता. मराठी संगीत नाटकांच्या जशा अनेक कंपन्या होत्या. तसेच सर्कस कलेमध्ये सुद्धा अनेक कंपन्या असून त्या लोकांचे मनोरंजन करत असत. दुसऱ्या महायुद्धाची मोठी झळ सर्कस कंपन्यांना बसली. यामध्ये देवल सर्कसलासुद्धा उतरती कळा लागली. पुढे महात्मा गांधींच्या हत्येनंतर जाळपोळ आणि सगळीकडे लुटालूट सुरू झाली. याचा परिणाम देवल सर्कसवर सुद्धा झाला. काही अज्ञात माणसांनी देवल सर्कसची मोठ्या प्रमाणात लूट केली. या सगळ्यांमध्ये लोकांच्या मनात सिनेमा पाहण्यासाठी वेड वाढू लागले. यामुळे सर्कस आणि संगीत नाटक कंपनी अक्षरशः डबघाईला आल्या. बंडोपंत देवल यांनी रंगवलेला विदुषक पाहायला जी गर्दी आधी व्हायची, ती गर्दी ओसरली. सर्कशीच्या तंबूत शुकशुकाट झाला आणि अखेर १९५७ साली देवल सर्कस म्हणजेच ग्रेट इंडियन सर्कसवर अखेरचा पडदा पडला. अशा भारतातील सर्कस सम्राटाचे दि.१६ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here