[जागतिक युनिसेफ स्थापन दिन विशेष]
जगातील अविकसित देशांतील बालके व माता यांच्या आरोग्य सुधारणेसाठी पोषक आहार, पर्यावरण-स्वच्छता, शिक्षण, समाजकल्याण इ.बाबींमध्ये मूलभूत सेवा सुविधांविषयक एक योजना तयार केली. बालहक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सोपवली आहे. त्यानुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषक आहार आदी सुविधा व सवलती त्यांना प्राप्त करून द्याव्यात, असे निवेदन त्यात आहे. या जाहीरनाम्यान्वये बालकांचे हक्क जपण्यात आले आहेत. बालकांच्या आंतरराष्ट्रीय वर्षातील संयुक्त राष्ट्रांच्या विविध उपकमांचा समन्वय साधणारी युनिसेफ ही मध्यवर्ती संघटना होय. ही ज्ञानवर्धक व अभ्यासपूर्ण माहिती श्री एन. के. कुमार जी. गुरुजी या लेखातून मांडत आहेत, अवश्य वाचा… संपादक.
संयुक्त राष्ट्रांनी बालकल्याणार्थ स्थापन केलेले अभिकरण- एजन्सी होय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दि.११ डिसेंबर १९४६ रोजी त्याची स्थापना केली. त्याचे पूर्वीचे नाव युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड असून युनिसेफ या संक्षिप्त नावाने ही संस्था सर्वपरिचित आहे. यूरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची झळ पोहोचलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार आदी पुरवण्याचे कार्य युनिसेफने स्थापनेनंतर लगेचच तत्परतेने सुरू केले. त्यानंतर त्याने आपले सेवाक्षेत्र विस्तारले आणि सन १९५०नंतर विशेषत: कमी विकास झालेल्या देशांत आणि आपद्ग्रस्त भागांत लक्ष केंद्रित केले. बालकांमधील रोगराई, कुपोषण, निरक्षरता यांचे उच्चाटण करण्यासाठी काही दीर्घ पल्ल्याचे उपक्रम कार्यान्वित केले. पुढे सन १९५३मध्ये त्याच्या शीर्षकातील इंटरनॅशनल व इमर्जन्सी हे शब्द वगळले.
विद्यमान काळातील युनिसेफचे कार्य म्हणजे अविकसित तसेच विकसनशील देशांतील कोट्यावधी बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्या त्या देशांतील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सर्वतोपरी साहाय्य करणे व शंभराहून अधिक देशांतील बालकांचे अनारोग्य, उपासमार, निरक्षरता यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे यासाठी मदत करते. बालकांसाठी रोगनियंत्रण कार्यक्रम, आरोग्य केंद्रे, दीन-सेवाकेंद्रे, शालेय आहार योजना, तसेच इतरही अनेक प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवते. सुश्रूषा, अध्यापनादी सेवांचे प्रशिक्षण व्यक्तींना देण्यासाठी यामार्फत आर्थिक अनुदानही दिले जाते.
युनिसेफचे एक मुख्य कार्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक समितीमार्फत विविध देशांतील प्रतिनिधींचे कार्यकारी मंडळ तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जाते. त्याच्या या कार्यकारी मंडळाच्या अखत्यारीत धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे घालून देणे व त्याच्या कार्यकमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, ही कार्ये प्रामुख्याने येतात. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव कार्यकारी संचालकाची नियुक्ती करतात. त्याच्या न्यूयॉर्कच्या मुख्यालयातील १,४०० कर्मचारी तसेच जगभरातील सुमारे ४० क्षेत्रीय कार्यालये ही कार्यकारी संचालकांच्या नियंत्रणाखाली येतात. त्याचे शंभराहून अधिक देशांत जे उपक्रम चालतात, त्यांपैकी अनेक संयुक्त राष्ट्रांच्या इतर अभिकरणाच्या तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने संयुक्त रीत्या चालतात. संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमार्फत विविध देशांचे नागरिक असलेल्या ३६ कार्यकर्त्यांची निवडलेली समिती या संस्थेचा दैनंदिन व्यवहार व इतर कामकाज सांभाळते. याशिवाय योजना बनविणे, उपक्रमांना मान्यता देणे व आर्थिक नियोजन करणे, अशा जबाबदाऱ्या या समितीमार्फत पार पाडल्या जातात.
युनिसेफ- दि युनायटेड नेशन्स चिल्ड्रंस फण्ड म्हणजे पूर्वीची दि युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रंस इमर्जन्सी फण्ड याची स्थापना झाली. ती संयुक्त राष्ट्रसंघामार्फत दुसरे विश्वयुद्ध संपल्यानंतर युद्धामध्ये होरपळलेल्या देशांमधील मातांना आणि मुलांना आवश्यक तो अन्नपुरवठा आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी दि.११ डिसेंबर १९४६ रोजी करण्यात आली. पोलिश फिजिशियन लुडविक रॅशमन यांच्याकडे या संस्थेचे संस्थापक म्हणून पाहिले जाते. तसेच या संस्थेचे प्रथम अध्यक्ष देखील हेच होते. हे एकमेव अध्यक्ष आहेत ज्यांनी दोन वर्षांपेक्षा या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला होता. सन १९५० साली या संस्थेच्या कार्याची कक्षा वाढवून विकसनशील देशांमधल्या लहान मुलं आणि स्त्रिया यांच्या दीर्घकालीन गरजा आणि समस्यांचे निदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. सन १९५३ साली ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाचा कायमचा भाग झाली आणि यातून इंटरनॅशनल व इमर्जन्सी हे दोन शब्द वगळण्यात आले. तरीदेखील याचे पूर्वीचे संक्षिप्त नाव युनिसेफ तसेच वापरात आहे.
सरकारी आणि खाजगी देणगीदारांकडून मिळणाऱ्या देणग्यांमार्फत या संस्थेचा कारभार चालवला जातो. या संस्थेचं सन २०१५ सालचं उत्पन्न ५ अब्ज ९५ लक्ष ५७ हजार ४७१ डॉलर इतके होते. संस्थेच्या कारभारासाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक बाबींमध्ये विविध देशांमार्फत मिळून दोन तृतीयांश एवढा वाटा उचलल्या जातो. उर्वरित वाटा खाजगी संस्था आणि स्वेच्छेने काही लोकांनी वैयक्तिक रित्या उचललेला असतो. संस्थेच्या उत्पन्नाच्या ९२ टक्के वाटा हा या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर खर्च केला जातो. यांचे उपक्रम- योजना लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी चालना देणाऱ्या असतात. या संस्थेचं कार्य एकूण जगातील १९२ देशांमध्ये चालतं. दीडशेहून अधिक देशांमध्ये या संस्थेची कार्यालयं आहेत आणि चौतीस राष्ट्रीय समित्यांमार्फत विविध देशांमध्ये या संस्थेचे कामकाज यजमान देशासोबत मिळून तयार केल्या जाणाऱ्या उपक्रमांमार्फत चालवले जाते. संस्थेच्या विविध ठिकाणी असलेल्या सात मुख्य प्रादेशिक कार्यालयातून विविध देशात असलेल्या कार्यालयांना तांत्रिक मदत देण्यात येते. याच संस्थेचं दुसरे मुख्य कार्यालय डेन्मार्क देशाच्या राजधानी असलेल्या कोपनहेगन येथेही आहे.
मुलांना आवश्यक असणाऱ्या लसी आणि प्रतिजैविक औषधांचा पुरवठा हा मुख्यतः या कार्यालयातून करण्यात येतो. याशिवाय एड्स पीडित, कुपोषित माता व बालकांना मदत करणे, आपत्तीसमयी राहण्याची सोय करणे किंवा निवाऱ्यासाठी ठिकाण उपलब्ध करून देणे, तात्पुरत्या छावण्या उभारणे, कुटुंबातील विखुरलेल्या- हरवलेल्या सदस्यांचे पुर्नमिलन घडवणे आणि शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणे, आदी उपक्रम राबविले जातात.
युनिसेफला स्वेच्छेने दिल्या जाणाऱ्या देणग्या, निधी यांद्वारे अर्थसाहाय्य होते. त्याच्या उत्पन्नाचा जवळजवळ तीन-चतुर्थांश हिस्सा वेगवेगळ्या देशांच्या शासनांकडून येतो. काही उत्पन्न निरनिराळ्या संघटना, व्यक्ती यांच्या देणग्यांतून मिळते, तसेच भेटकार्डांची विकी व इतर निधिसंकलन योजना यांतूनही काही उत्पन्न जमते. त्याच्या एकूण उत्पन्नापैकी एक-चतुर्थांश हिस्सा तातडीच्या आपत्कालीन सेवांसाठी राखून ठेवलेला असतो. नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थैर्य, साथीचे रोग अशा कारणांमुळे नुकसान पोहोचलेल्या विपद्ग्रस्त बालकांसाठी त्याचा उपयोग केला जातो. दीर्घ पल्ल्याच्या पुनर्वसन योजनांसाठीही युनिसेफ साहाय्य देते. बालपणी उद्भभवणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच एच्आयव्ही- एड्स सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून उपयोजिलेल्या प्रतिरक्षक उपकमांना युनिसेफ सर्वतोपरी मदत करते. सन १९७६मध्ये त्याने जगातील अविकसित देशांतील बालके व माता यांच्या आरोग्य सुधारणेसाठी पोषक आहार, पर्यावरण-स्वच्छता, शिक्षण, समाजकल्याण इ.बाबींमध्ये मूलभूत सेवा सुविधांविषयक एक योजना तयार केली.
बालहक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सोपवली आहे. त्यानुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषक आहार आदी सुविधा व सवलती त्यांना प्राप्त करून द्याव्यात, असे निवेदन त्यात आहे. या जाहीरनाम्यान्वये बालकांचे हक्क जपण्यात आले आहेत. साहेब, आपल्याकडे अविकसित भागातील प्राथमिक शाळा कमी पटसंख्येच्या बनावाखाली बंद केल्या जात आहेत. युनिसेफ यात जातीने लक्ष घालेल का? मागास भागातील आमच्या या दळभद्री बालकांना न्याय मिळेल का? असे लोकातून प्रश्नचिन्ह उमटतात. बालकांच्या आंतरराष्ट्रीय वर्षातील संयुक्त राष्ट्रांच्या विविध उपकमांचा समन्वय साधणारी युनिसेफ ही मध्यवर्ती संघटना होय. सन १९६५मध्ये त्याला त्याच्या बालकल्याणाच्या कार्यार्थ, तसेच आंतरराष्ट्रीय बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या भूमिकेबद्दल शांततेसाठी असलेला नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या शिवाय सन १९८९ साली इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आणि सन २००६ साली प्रिन्स ऑफ अस्च्यूरियास अवॉर्ड ऑफ काँकॉर्ड ही पारितोषिकेही देण्यात आली आहेत.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे विश्वातील सर्व बालकांना युनिसेफ स्थापन दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
✒️श्री एन. के. कुमार जी. गुरुजी(पोटेगावरोड, पॉवरस्टेशनच्या मागे, गडचिरोली)फक्त व्हॉट्स ॲप- ९४२३७१४८८३