✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
मुंबई(दि.8डिसेंबर):-इंडियामार्ट’ या वेबपोर्टलवर सध्या अवैधरित्या बनविण्यात आलेली औषधे विक्रीस उपलब्ध आहेत. यामुळे लाखो ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती पुराव्यासह आलेली आहे.
पुण्यातील एस. रेमिडीस ( Ace Remides ) या कंपनीला काही औषधांची विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र या कंपनीने अन्न व प्रशासन विभागातील टॉपच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन चक्क बेकायदेशीरपणे औषधांचे उत्पादन करायला चालू केले, इतकेच नव्हे तर ही सर्व अवैधरित्या बनवलेली औषधे जगभरात विकायलाही सुरुवात केली. यातून या कंपनीच्या मालकांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली.
‘स्प्राऊट्स’ने या गोरखधंद्याचा सर्वप्रथम पर्दाफाश केला, त्यानंतर सूत्रे हलली. या कंपनीच्या वाकड येथील कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तेथे त्यांना काही अप्रमाणित औषधांचे नमुने सापडले. याशिवाय इतरही अवैध औषधे अधिकाऱ्यांना सापडली. मात्र इतके होवूनही या अधिकाऱ्यांनी, कंपनीचे संचालक प्रवीण अग्रवाल व व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार गोयल यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदविला नाही.
वास्तविक या आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम २७४, २७६, ४१९ व ४२० नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. तसेच द कंपनी ऍक्ट २०१३ मधील कलम ११९, १७२, ४१९ व इतर विहित तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई होणे आवश्यक होते, मात्र ही चौकशी या अधिकाऱ्यांकडून ‘मॅनेज’ करण्यात आली. त्यामुळेच हे अवैधरित्या औषधे विकणारे आरोपी मोकाट फिरत आहेत व खुलेआम अवैधरित्या औषधांची विक्री करीत आहेत.
अवैधरित्या तयार करण्यात आलेली ही सर्व औषधे ‘इंडियामार्ट’ या ईकॉमर्सच्या वेबपोर्टलवर होलसेलमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना ‘हप्ते’ असल्यामुळेच ही औषधे बेकायदेशीरपणे विक्रीस उपलब्ध आहेत, यामुळे लाखो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे, असा आरोप ‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमने केला आहे.
याबाबत प्रतिक्रियेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.