✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
चोपडा(दि.6डिसेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व अध्ययन केंद्रातर्फे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी केला. देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती केली. माणसाला माणूस म्हणून जगता यावे तसेच हक्क व अधिकार मिळायला हवा, या उद्देशाने त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख श्री.डी.एस. पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा समाज उन्नतीसाठी वापर केला.अभ्यास व संशोधन यातून लोककल्याण साधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार व कार्यातून प्रेरणा घ्यावी व त्यांच्या आदर्श विचारांचा जीवनात अवलंब करावा.
यावेळी श्री.व्ही.पी.हौसे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रात मौलिक लेखन करून महिला व मजुरांचे प्रश्न, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतोनात प्रयत्न केले असून भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण लेखन केले आहे.डॉ. बाबासाहेबांनी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.श्री.एस.बी.पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्ती नसून विचार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मौलिक ग्रंथांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आदर्श विचारांचा अवलंब आपल्या जीवनात करायला हवा.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, बंधनांच्या व गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांच्या ग्रंथांचे वाचन करायला हवे.अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने सोप्या भाषेत महत्वपूर्ण लेखन केले. शेतमजूर, कामगार व महिलांच्या विकासासाठी उपाययोजना सुचविल्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा, कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या आदर्श विचारांचा परिचय करून द्यायला हवा. विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे विचार करायला शिकायला पाहिजे कारण त्यातूनच सारासार विवेकबुद्धी विकसित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डी.डी. कर्दपवार यांनी केले तर आभार डॉ.आर.आर. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.