संविधानासारखी अनमोल ठेव समस्त भारतीयांसाठी ठेवून सर्वांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद निर्माण करून देणाऱ्या महान सूर्याचा अस्त 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. आणि भारताला नवी दिशा देणारा तेजस्वी युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. 5 डिसेंबरच्या रात्री *बुद्ध आणि त्याचा धम्म* या ग्रंथाच्या दोन प्रकरणाच्या प्रती सोबत घेऊन त्याची तपासणी केली व दुसऱ्याच दिवशी डॉ आंबेडकरांचे निधन झाले. म्हणजेच मरणाच्या शेवटच्या दारात असताना सुद्धा ज्या मानवाने आपले लक्ष हे विचलित न होऊ देता फक्त आणि फक्त जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्च केले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो पण त्यांची ओळख नुसती संविधानाचे शिल्पकार नसून, एक महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ ,राजनीतिज्ञ, महान तत्वज्ञ, अशी सुद्धा आहे. न्याय मंत्री म्हणून त्यांनी आयुष्यभर मागासलेल्याचा, दलितांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. महिलांसाठी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने करणारे एकमेव महानायक म्हणजे डॉ आंबेडकर होते.
डॉ आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव होते. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ आंबेडकर नावाच्या तेजस्वी सूर्याचा जन्म जनकल्याणासाठी झाला .रामजी व भिमाईचे चौदावे रत्न म्हणून भीमराव जन्माला आले. त्यांचे वडील महू येथे सुभेदार या पदावर सैनिकी अधिकारी होते. इंग्रजी सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुभेदार रामजी सपकाळ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दापोली येथे परिवारासह राहू लागले. डॉ आंबेडकर वयाने लहान असल्याने त्यांचा शाळेत प्रवेश होऊ शकला नाही. त्यांच्या वडिलांनी घरीच त्यांना अक्षर ओळख व अंकगणिताचे धडे दिले. डॉ आंबेडकर अवघ्या पाच वर्षाचे असताना त्यांची आई भिमाबाई चे निधन झाले. व आंबेडकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण आंबेडकरांनी कुठली तमा न बाळगता आईच्या मृत्यूचे दुःख पचवून आपले लक्ष शिक्षणाकडे वळविले .आंबेडकर विद्यार्थी असताना 18 तास अभ्यास करत असत. भारतात मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. मनूवादी विचारसरणीचे लोक त्यांना संस्कृत शिक्षणास विरोध करत होते म्हणून त्यांनी पार्शियन विषय घेऊन परीक्षा दिली.
व बडोदा संस्थानात नोकरी करू लागले. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्तीची व्यवस्था करून डॉक्टर आंबेडकरांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितले. तेथे त्यांनी *प्राचीन भारतीय व्यापार* या विषयावर संशोधन केले व पीएचडी ही पदवी मिळविली भारतात परत आल्यावर त्यांनी बडोद्याच्या राजाच्या दरबारात लष्करी अधिकारी व आर्थिक सल्लागाराची जबाबदारी स्वीकारली. पण आंबेडकर हे अस्पृश्य असल्याने त्यांना आपल्या कार्यालयातील सहकारी अधिकारी चांगली वागणूक देत नव्हते सतत त्यांचा अपमान करत होते. संपूर्ण बडोदा शहरात त्यांना अस्पृश्य असल्याने कुणीही घर भाड्याने देण्यास तयार नव्हते. ही गोष्ट त्यांना पटली नाही आणि या गंभीर समस्येवर मार्ग काढण्याचे त्यांनी ठरविले. मुंबईमध्ये अर्धवेळ प्राध्यापक व वकिलीचा व्यवसाय करून ते रमाबाई बरोबर आपले आयुष्य घालवत होते व अशिक्षित लोकांना जागे करण्याचा मानस त्यांनी बांधला होता. राजकीय सुधारणा व्हावी यासाठी ते अनेक वेळा आपले विचार लोकांना पटवून सांगत होते .लोकांना अस्पृश्यतेच्या कलंका पासून वाचविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत होते.
जागतिक बौद्ध परिषदेत डॉक्टर आंबेडकरांना बोधीसत्व ही उपाधी प्रदान करण्यात आली. बीए ,एम ए ,एम एस सी, पी एच डी ,लॉ ,डिलीट अशा 32 मानद पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाल्या होत्या. भारत सरकारच्या 2012 मध्ये झालेल्या *द ग्रेटेस्ट इंडियन* या सर्वेक्षणामध्ये सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. ही भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. डॉक्टर आंबेडकरांनी विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक क्षेत्रात भरीव कामगिरी करून राष्ट्र निर्मीतीला नवी दिशा दिली.
अस्पृश्यता, जातीयता, पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह, दलितांचा मंदिर प्रवेश ,अनेक रूढी परंपरेचा नायनाट करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले, मूकनायक, समता ,जनता प्रबुद्ध भारत ,बहिष्कृत भारत यासारख्या साप्ताहिकातून लेखन करून वंचित ,शोषित, दलित यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. हिंदू विधेयक संहिते द्वारे घटस्फोट, मालमत्तेतील वारसा हक्क, यासाठी त्यांनी लढा दिला हिंदू धर्मात समानतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी बरीच वर्षे संघर्ष केला. व शेवटी धर्मांतराचे पाऊल उचलले. त्यासाठी जगातील विविध धर्माचा अभ्यास करून मूळ भारतातील असलेल्या विज्ञानवादी व मानवतावादी धर्म म्हणून बौद्ध धर्माची निवड केली .व 14 ऑक्टोंबर 1956 साली पाच लाख अनुयायांसह नागपूर शहरांमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि *बुद्ध आणि त्याचा धम्म* या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात बौद्ध धर्माला नवसंजीवनी दिली. डॉक्टर आंबेडकरांनी *द प्रॉब्लेम ऑफ रुपी* हा शोधनिबंध लिहिला व त्या आधारे भारतात *रिझर्व बँक ऑफ इंडियाची* स्थापना झाली.
भारत देशाचा आर्थिक विचाराचा पाया मजबूत करण्याचे काम डॉक्टर आंबेडकरांनी केले. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेती व शेतमजूर जर समृद्ध झाला तर देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. ही दूरदृष्टी आंबेडकरांची होती. देशातील दुष्काळ संपवायचा असेल तर पाण्याचे नियोजन करावे लागेल, कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र कमी करून बागायती क्षेत्र वाढवावे लागेल, यासाठी आंबेडकरांचा आग्रह होता. ब्रिटिश सरकारला त्यांनी पाण्याचे नियोजन करून शेतीचे फायदे ठरविणारे नियोजन सादर केले .म्हणजे एक दूरदृष्टीचा नेता म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे नाव सन्मान घेतले जाते. शेतकऱ्यांसाठी पीक पद्धती, शेतमालाची विक्री, साठवण व्यवस्था ,शेतमालाचे भाव, उत्पादकता वाढ ,पाण्याची उपलब्धता याविषयी सर्व नियोजन आंबेडकरांनी आपल्या विचारात मांडले. *हिंदू कोड बिल* हे भारतीय स्त्रियांचे सशक्तिकरन करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले. यामध्ये मालमत्तेत स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले गेले. विवाह, पोटगी, घटस्फोट ,दत्तक पत्र इत्यादी सारखे अनेक प्रश्न हिंदू कोड बिलामुळे सुटले. स्त्रियांना सन्मानाने जगता यावे यासाठी आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला व हिंदू कोड बिलाच्या रूपाने स्त्री जीवनाची नवीन जीवनशैली उदयास आली. भारतीय संविधान सभेने जात, धर्म, लिंग, धर्म ,प्रांत याचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणुकीचा अंगीकार केला होता पण तरीही हिंदू स्त्रियांना न्याय देण्यास विरोध झाला. व कायदा पास होऊ शकला नाही, म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण ते स्त्रीमुक्तीसाठी झटत राहिले.
डॉक्टर आंबेडकरांच्या निवडणूक आयोग, नियोजन आयोग, निवडणूक आयुक्त यासारख्या नियोजनामुळे भारतीयांचे राजकीय महत्त्व टिकून राहिले. प्रत्येक राज्याची कर्तव्य ठरवून दिली असल्याने भारतीयांना आपले अधिकार प्राप्त झाले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हक्क जनमानसात पोहोचले. व लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला आपला सहभाग नोंदविण्याचा व मतदानाच्या रूपाने आपणच देशाचे ,राज्याचे ,गावाचे रक्षक आहोत हे भावना दृढ होण्यास मदत झाली, आंबेडकर कामगार मंत्री असताना कष्टकरी, मजूर वर्गाचे ,कामगारांचे कामाचे तास बारा तासावरून आठ तास केले. समान काम समान वेतन, स्त्रियांसाठी प्रसुती रजा, कर्मचारी विमा योजना, आरोग्य संरक्षण, भरपगारी रजा ,पेन्शन योजना आधी सर्व कायदे संमत करून घेतले. दुर्बल घटकाच्या हितासाठी *स्वतंत्र मजदूर पक्षाची* स्थापना केली व 17 पैकी 15 सदस्य निवडून आणात आपले सत्तेत वर्चस्व कायम ठेवले. अपंग, कामगार, अपघाताने मृत्यू झालेले कामगार यासाठी नुकसान भरपाईची तरतूद करणे. कोळसा खान कामगारांच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम सुद्धा आंबेडकरांनी केले. म्हणजेच देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आंबेडकर करत होते. हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
लोकशाहीमध्ये आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण संविधानातील सर्वमान्य कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. त्यामुळे भारतीय संविधान आपले श्रेष्ठत्व दर्शविते. आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहे. आणि हे अधिकार आपल्या संविधानाची विशेषता दर्शविते, कारण लोकशाही देशांमध्ये लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करणे हाच मूळ उद्देश असतो. अधिकाराबरोबरच संविधानामध्ये आपली काही कर्तव्य सुद्धा दिलेली आहे. भारत देशात उच्च व सर्वोच्च न्यायालय हे नागरिकांच्या अधिकाराच्या संरक्षण करण्याकरिता उभे आहे. सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त झाले आहे कोणी व्यक्ती सर्वोच्च पदाने, संपत्तीने, प्रसिद्धीने ,कलेने कितीही मोठा असला तरी तो व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. ही आपल्या संविधानाची देण आहे .भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास व्यक्ति स्वतंत्र बहाल केले आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक व्यक्ती आपले मत मांडू शकतो. स्व इच्छेने लिखाण करू शकतो . धार्मिक स्वातंत्र्यामुळे प्रत्येक धर्मातील व्यक्तीला आपल्या धर्माची उपासना करण्याची मुभा बहाल करण्यात आली आहे. त्यामुळेच सर्वधर्म समावेशक समाज आज आपल्या देशात टिकून आहे. याचे सर्व श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 17 नुसार अस्पृश्यतेचा कलंक नष्ट केला व कलम 32 नुसार प्रत्येकाला आपल्यावर झालेल्या अन्यायविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर अफाट उपकारच केले आहे. म्हणून आजच्या या महापरिनिर्वाणदिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपले भाग्यविधाता होते असे म्हणावेसे वाटते. कारण संपूर्ण मानव जातीचा विचार करून प्रत्येकाला न्याय देऊन समस्त भारतीयांचे भाग्य उजळण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशा या ज्ञानाच्या महान अथांग महासागरास महापरिनिर्वाणदिनी कोटी कोटी प्रणाम!!!!!!!!
====================
✒️अविनाश अशोकराव गंजीवाले(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव पंचायत समिती तिवसा जिल्हा अमरावती)