Educate, Oraganise and Agitate विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर 2022या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने विनम्र अभिवादन.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, जलतज्ञ, राजनीतीतज्ञ, पत्रकार, विद्यार्थी,उत्तम प्रशासक, परखड वक्ते, आणि अखिल मानव जातीचे मुक्तीदाते, मार्गदर्शक आणि योद्धा या सर्व भूमिका सर्वांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
24 सप्टेंबर 1944 ला मद्रास येथील भाषणात संदेश देतांना, म्हणतात जाओ और अपनी दिवारो पर लिखो की आपको इस देश की शासनकर्ती जमात बनना है”.याचा अर्थ 75 वर्ष होत असतांनाही आम्हाला समजला काय! शासनकर्ती जमात बनण्यासाठी काही कृतिकार्यक्रम नियोजन आहे काय! मताचा अधिकार वापरत असतांना तो आम्ही कसा कुठे वापरतो याचा विचार करावा लागेल!तसेच तर स्कुल ऑफ पॉलिटिक्स पुणे बाबत त्यांनी ऑक्टोबर 1945 विचार व्यक्त केला. पुढे जुलै 1956 *दी ट्रेनिंग स्कुल फॉर इंट्रेनस टू पॉलिटिक्स* पुणे येथे स्थापन केली त्यावेळी संसदीय लोकप्रतिनिधी यांना अर्थशास्त्र, राजनीती,समाजशास्त्र व संसदीय नियमांचे प्रशिक्षण देणे हा उद्देश होता.ज्यामुळे त्यांना आपल्या हक्क अधिकार सामाजिक जाणिव जागृती व त्यासाठी राबवायची ध्येयधोरणे,कामे समजली पाहिजेत
आज आमच्या लोकप्रतिनिधी यांनी आपल्या कृती व वर्तन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश यांचा मेळ लावणे गरजेचे आहे!
पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून मिलिंद कॉलेज औरंगाबाद,सिद्धार्थ कॉलेज मुंबई यांच्या स्थापना ही शिक्षणक्रांतीच्या हेतूने केली होती! त्या कॉलेज मधून बाहेर पडलेले विद्यार्थी उच्चशिक्षित,उच्चपदस्थ अधिकारी/पदाधिकारी झाले,विविध पदावर गेले आहेत!परंतु आज संस्थेच्या बाबत दिसून येणारी उदासीनता योग्य आहे काय? संस्थेचा वाढ विस्तार का होत नाही! का न्यायालयात वाद नेवून खीळ घातली जात आहे! विचाराने परिवर्तित झालेला समाज याबाबत षंढ झाला आहे काय?
20 वर्ष चिंतन विचार करून दिलेला धम्म आमच्या पैकी किती जणांना समजला आहे! किती समजून घेत आहेत आणि रुजविण्यासाठी यंत्रणा सक्षम निर्माण केली आहे काय! आज घरावरच्या झेंड्यापेक्षाही घरात धम्म हवा आहे.भेटीच्या अभिवादनासोबत कृतीतही *भीम* हवा! कारण बरेच बांधव आसरा,बिरोबा,मुंजे,सकुन पाहणे, कुठे सैलानीसारखे बाबा बापू अम्मा अंगारे धुपारे,अंगात येणे,विटाळ मानणे,10 दिवसीय उत्सवात नाच गाणे दिसून येत आहे.वरातीत अमंगल वाद्य व नशेत नाचणे चालू झाले आहे.
विहार ही विचारांची केंद्रे व्हावीत.तेथून नियमितपणे आठवड्यात उद्बोधन होणे गरजेचे आहे! हा आशावाद सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करूयात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बुद्धमय भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस सी एस टी ओबीसी यांच्या सोबत संवाद साधत वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणारे विचार कृती,राष्ट्रीय सण उत्सव यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
आम्ही *पंचशील* ग्रहण करतो,असा शब्द वापरतो, वर्तन बहुतेक तसे होत नाही! पंचशील मराठीत अर्थ पाहूया!
१.पानातीपाता वैरमणी सिक्खा पदम समाधीयामी:- कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही.मग नवस फेडण्यासाठी कंदुरी बोकुड, कोंबड्या.. किंवा भावाभावात /पती पत्नी यांच्यात होणारी हिंसक भांडणे याचा विचार कुठे जातोय?
२.आदीन्नदाना वैरमनी सिक्खा पदं समाधीयामी:- चोरीने किंवा दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने,बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे.
३.मुसावादा वैरमणी सिक्खा पदं समाधीयामी:- असत्य भाषणापासून अलिप्त राहणे.
४.सुरामेरय,मज्जपमादठाणा वैरमणी सिक्खा पदं समाधीयामी:- सर्व प्रकारच्या मादक पदार्थ/पेयांपासून अलिप्त राहणे. मग तंबाखू, गु टखा खाणारे,बिड्या सिगारेट ओढणारे,मदिरा पिणारे यांनी करत असलेल्या गद्दारी साठी काय प्रायश्चित्त करणारं!
ज्या डॉ.आंबेडकरांनी परदेशात अतिशय थंड वातावरणात मदिरा (दारू) सहजपेय आहे,त्याठिकाणी आणि भारतात सुद्धा दारूच्या ग्लासला स्पर्श केला नाही. कोणतेच व्यसन केले नाही.आताचे काही राजकीय पदाधिकारी, वरिष्ठअधिकारी रात्रीच्या वेळी ‘बार’ मध्ये बसून दिवसभरात बहूजन समाजासह कांबळे, येडे, म्हस्के, सोनवणे यांना कसं अडवून लुटलं याच्या गप्पा ग्लास ला ग्लास लावत जयभीम नावाचा ‘चिअर्स’ करत आहेत! कंदुऱ्या, जावळ, नवस आजही चालू आहेतच की याचा विचार करावा!
५.कामेसुमेच्छारा वैरमणी सिक्खा पदं समाधियामी:- कामवासना पासून अलिप्त राहणे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश
18 मार्च 1956 ला आग्रा येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी”मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया !” असे विधान करतात. कारण शिकलेल्या लोकांनी बेइमानी करून समाजाची लुबाडणूक करीत आहे. स्वतः चे कुटुंब,घर यांचीच पोटे भरत आहे.समाजाला वेळ,बुद्धी,पैसा देत नाहीत. आजची मंडळी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानते पन त्यांनी सांगितलेल्या संदेशाला मनात नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या दिवसात स्वीय सहायक नानकचंद रत्तु 31 जुलै 1956 चा प्रसंग सांगतात !, की बाबासाहेब आंबेडकर अनेक रात्री पायात डोके घालून फुंदतात,रडतात. त्या दिवशी धाडस करून मी विचारले की,बाबासाहेब तुम्ही रात्र रात्र झोपत नाहीत आणि असे का रडतात. त्यावेळी बाबासाहेब सांगतात, *”माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी केलेल्या धोकाघडीचे आणि संघर्ष करून मिळविलेल्या हक्क अधिकार यासाठी पुढे नेणारे अनुयायी नसल्याचे दुःख यामुळे रडतो आहे!”* यातून आपण भक्त न बनता अनुयायी होऊया!
ज्या संविधानामुळे प्रतिनिधित्व मिळाले, हक्क अधिकार मिळाले आणि देशात समता, बंधुता,न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित राष्ट्र निर्माण व्हावे. यासाठी “संविधान ” टिकविणे,त्याचा संपूर्णपणे अंमल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.शेवटी वामनदादा कर्डक यांच्या ओळीत ,
*भीमा तुझ्या मताचे जर पाच लोकं असते| तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.*||
*वाणीत भीम आहे करणीत भीम असता,|वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते*!||
त्यासाठी आपण प्रत्येकाने मिशनमोड मध्ये संघटितपणे काम करूया.आपली समस्या ही राष्ट्रव्यापी आहे,म्हणून राष्ट्रव्यापी संघटनेत सतत कार्यरत राहणे हाच एकमेव पर्याय आहे. निश्चितच आपण आपला वेळ, बुद्धी, श्रम आणि पैसा देवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे नेवूच अशी आशा आणि विश्वास वाटतो.
1⃣ *जन्म आणि शिक्षण*:-
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भिमाबाई होते. रामजी हे सैन्यात सुभेदार होते. प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण केले. त्यानंतर ते मुंबई येथे स्थायिक झाले. मुंबईत असतानाच 1906 ला रमाबाई यांच्या सोबत साध्या पद्धतीने भायखळा येथे बाबासाहेबांचा विवाह झाला.1907 ला मॅट्रिक परीक्षा पास झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा एस. के. बोले यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. सत्कारात केळुसकर गुरुजीनी स्वलिखित ‘भगवान बुद्धांचे चरित्र ‘हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1912 ला मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयामध्ये मध्ये बी.ए. पदवी मिळवली.पर्शियन व इंग्रजी या विषयात ही मुंबई विद्यापीठाची बी.ए.पदवी मिळवली. याच धावपळीत 2 फेब्रुवारी 1913 ला वडील रामजी आंबेडकर यांचे निधन झाले. त्यामुळे बाबासाहेबांना एक मोठा धक्का बसला. कसे सावरणार यातून! कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आली. उच्चशिक्षण घेण्याची ओढ निर्माण झाली होती.
उच्चशिक्षण घेण्यासाठी मार्ग निघाला केळुस्कर गुरुजी यांच्या मदतीने बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी 1913 ते 1916 तीन वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर केली. ज्यामुळे जून 1915 साली कोलंबिया विद्यापीठ यांची एम.ए.ची पदवी मिळवली. 1917 ला पी.एच.डी.करिता “कास्ट इन इंडिया देयर मेकॅनिझम,जेनेसिस अँड डेव्हलपमेंट” हा शोधनिबंध लिहिला.1922 ला ग्रेस इन मधून बॅरिस्टर ही पदवी प्रचंड अभ्यास करून मिळवली.1923 ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स डी.एस.सी. अवॉर्ड झाली. अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.प्रचंड अभ्यास करून उच्चविद्या संपादन करत राहिले.जागतिक विद्वान म्हणून त्यांचे स्थान अग्रक्रमाने आहे.2⃣ *नोकरी न करता सामाजिक कार्य संघर्ष* :-उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर मोठ्या पगाराची नोकरी देणाऱ्या अनेक व्यक्ती,संस्था तयार होत्या. प्राध्यापक,प्राचार्य, न्यायाधीश म्हणून नोकऱ्या वाट पाहत होत्या. परंतु आंबेडकरांनी नोकरी न करता बहुजन समाजातील अन्यायग्रस्त शोषित वंचित दुर्बल शूद्रअतिशूद्र यांच्या संवेदना जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरविले. याचा एक भाग म्हणून 20 जुलै 1924 ला परेल मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणीसभा ‘ स्थापन केली.हिचे चेअरमन म्हणून स्पर्श व्यक्ती डॉ सर चिमनलाल सेटलवाड तर सचिव म्हणून चर्मकार असलेले सीताराम शिवतरकर तर कार्यकारी अध्यक्ष डॉ आंबेडकर होते. *Educate ,Oraganise and Agitate* अर्थात शिक्षित बना, संघटीत बना आणि संघर्ष करा हा मूलमंत्र ठरविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची ओळख ,सुरुवात ही 1916 पालवनकर बाळू या क्रिकेटपटूच्या सत्काराच्या निमित्ताने झाली. पी.बाळू हा त्या काळातील अतिशय उत्तम असा क्रिकेटपटू होता. परंतु अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चर्मकार जातीतील असल्याने मनुवादी व्यवस्थेने त्याचे नाव कधीच पुढे येऊ दिले नाही.
बाबासाहेब आंबेडकर यांचा 1916 ते 1956 या चाळीस वर्षाच्या कालखंडात अनेक संघर्ष,आंदोलने केली ज्यांचे लिखित रेकॉर्ड आहे.ज्यामुळे स्त्रियांसह सर्व बहुजन बांधवाना सन्मानाने माणूस म्हणून जीवन जगून प्रगतीच्या शिखरावर जाता आले. बाबासाहेब आंबेडकरांची चार मुले,पत्नी रमाई ही त्यांना वेळेवर औषध उपचार आणि कुटुंबाला वेळ न दिल्यामुळे मृत्यू पावली.आमचा संसार सुखी समाधानी व्हावा म्हणून त्यांच्या संसाराची राख झाली, हे आम्ही आज ध्यानात घेतले पाहिजे.
3 *शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर* :-
कोकणामध्ये खोती आंदोलन चालू होते. ज्यामध्ये नारायण नागु पाटील हे मार्गदर्शन करत होते. या आंदोलनाला बळकटी ही त्या काळात बाबासाहेबांच्या 1917 ला रिसर्च पेपर मध्ये च्या ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय’ या रिसर्च पेपरची नोंद घेण्यात आली.
याच बरोबर नारायण नागू पाटील म्हणजेच आजचे जयंत पाटील यांचे आजोबा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांचा नेता म्हणून जाहीर केले. ज्यामुळे डॉ आंबेडकरांनी मुंबईहून 600 किलोमीटरचा जहाज- बैलगाडी-पायी प्रवास करून शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे चालविले. *चरीचा संप* म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला ज्यात पंचवीस गावातील शेतकरी शेतात गेले नाहीत. उपासमार होऊ नये म्हणून त्यांना मुंबई येथून बाबासाहेब आंबेडकरांनी मदत मिळवून दिली.1928 मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये अर्थसंकल्पावर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी योजना मांडल्या.65 वर्षावरील शेतकरी पुरुषास व 60 वर्षावरील शेतकरी महिला यांना पेन्शन देण्यात यावे.1938 ला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत काढला ज्यामध्ये 25 हजार शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाचा परिणाम 2लाख हेक्टर दोन लाख हेक्टर जमीन ही कुळाच्या नावावर झाली. हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाचे फलित होय. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा प्रधानमंत्री हा शेतकऱ्यांचा मुलगा असावा आणि प्रशासनातील अधिकारी ही शेतकऱ्यांची मुले असावीत असा विचार मांडला.
ज्यावेळी चिपळूणकर यांनी शेतसारा वाढवावा अशी केसरी वर्तमानपत्राच्या द्वारे लेख लिहून मागणी केली त्यावेळी डॉ आंबेडकर यांनी त्यास विरोध केला आणि त्यापेक्षा इन्कम टॅक्स वाढवावा अशी चर्चा केली. शेतकरी आणि आणिशेतीच्या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये कलम 323 Bते Gमध्ये शेतकरी आयोग हमीभाव यासह अनेक तरतुदी केलेले आहेत. इथल्या मनुवादी व्यवस्थेने समजू दिल्या नाहीत आणि आम्हीही त्या घरात संविधान नसल्याने समजून घेतल्या नाहीत.
4⃣ *कष्टकरी कामगारांचे डॉ.आंबेडकर*:-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तुत्व बुद्धिमत्ता संघटन याची जाणीव इंग्रजांना निश्चितपणे झालेली होती आणि म्हणून जुलै 1942 ला केंद्रीय मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांना कॅबिनेट मंत्री बनवलं. इरिगेशन मिनिस्टर म्हणून काम करत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड डोळ्यासमोर ठेवला आणि भाकरा नांगल धरण , दामोदरखोरे प्रकल्प, महानदीवर प्रकल्प, कोसी गंगा ब्रह्मपुत्रा यावर प्रकल्प उभारले. जलविद्युत निर्मिती जलवाहतूक पर्यटन स्थळांचा विकास छोटे छोटे धरण आणि जल आयोगाची निर्मिती केली.पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना,गरिबांना विज स्वस्तात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली. कामगार मंत्री म्हणून निर्णय घेत असताना का स्वतः कामगारांच्या चाळीत राहिल्यामुळे प्रश्न समस्या माहित होत्या.कामगारांच्या संघटना व व्यवस्थापन त्यामध्ये चर्चा घडवून आणल्या. व्यवस्थापनात कामगारांचे प्रतिनिधी असावेत अशी व्यवस्था केली.आसाम मध्ये चहामळा कामगार यांच्या भेटी घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये कोळसा खाण कामगार यांच्या भेटी घेतल्या. एका खाणकामगार म्हणून खोलखाणीतून वर आलेल्या एका महिलेला प्रश्न विचारून चर्चा केली. त्याच ठिकाणी आदेश काढून महिला आणि पुरुष समान मजुरी, कामाचे तास 12 वरून 8 तास केले.प्रसूती रजा ही पगारी करण्यात आली.
5⃣ *महिलांसाठी डॉ आंबेडकर*:-बाबासाहेब आंबेडकरांना भिमाई असे सुद्धा म्हटले जाते. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना अतिशय हीन,नीच लेखले त्यामनुस्मृतिचे त्यांनी दहन केले.पर्यायी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली आहे. महिलांची सभा घेऊन त्यांना *”स्वच्छ राहा,पांढरपेशा स्त्रीयाप्रमाणे पोशाख करा.नवरा मुले हे दारू पिवून येत असतील तर त्यांना घरात घेवू नका.मुला मुलींना शिक्षण द्या.
*”कलम 13 मनुस्मृति अवैध ,कलम 14 All are Equal ,कलम 15 भेदभाव नष्टता,कलम 16 नोकरीत आरक्षण,कलम 19 भाषणं स्वातंत्र्य,कलम 25 धर्म स्वातंत्र्य.
यासह अनेक तरतुदी आहेत.
शेड्युल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात बाबासाहेब आंबेडकर सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत येताना एका स्त्रीला आई / बहिण/ पत्नी यांना सोबत घेवून या असे आवाहन करतात. यावेळी 50 हजार पुरुष आणि पंचवीस हजार स्त्रिया सहभागी होत्या.याच बरोबर स्त्रियांनी कपडे , केस कसे असावे .तसेच कुटुंबनियोजन,चुकीच्या गोष्टीसाठी नकार देण्यास शिकणे.याबाबत डॉ आंबेडकर मार्गदर्शन करतात.सोबत मताचा अधिकार हा स्त्रियांना ही दिला,ज्याचे मूल्य समान आहे.हिंदू स्त्रियांची अवनती हा संशोधन पेपर मध्ये तसेच हिंदूकोड बील मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी उपाययोजना सांगितल्या आहेत. परंतु त्यास त्यावेळेपासून आजपर्यंत अंमल केला नाही.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरू मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यासाठी ही हिंदू कोड बील लागू करत नाहीत,हे एक कारण होते
किमान हे *हिंदुकोडबील* समस्त महिलांनी वाचावे तरी!नोकरी करणाऱ्या महिला,व्यवसाय करणाऱ्या महिला यांनी आपल्या आज जे काय मिळाले आहे,याचे कारण किंवा स्रोत शोधला की समजेल यासाठी राष्ट्रपिता जोतीराव सावित्रीमाई,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि त्याग,समर्पण आहे.नाहीतर धर्माने अनेक बंधन घालून तिला ‘गुलाम’बनविले होते. फक्त चूल आणि मुलं एवढ्यावर मर्यादित केले होते.
6 *विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रेमी डॉ.आंबेडकर* :-
महात्मा फुले यांनी सांगितले की,
मती,नीती,गती,वित्त स्वाभिमान हे शिक्षणामुळे येते.तोच राजमार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेला.
4 जानेवारी 1925 सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले.ज्याचे व्यवस्थापक शिवाप्पा एस आयदले होते. तसेच 10 जुलै 1925 ला निपाणी येथे वसतिगृह काढले ज्याचे व्यवस्थापक बी एच वराळे होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना अनेक भाषणं देवून मार्गदर्शन केलेले आहे.ज्यात आर्थिक,गरिबीचेे भांड्वल कुणीही करू नये. कारण सर्वात जास्त गरिबी मी अनुभवली आहे. विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करत रहावे.ज्ञानाबरोबरच त्याच्याकडे शील असावेच.
तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कॉलेज औरंगाबाद, सिद्धार्थ कॉलेज मुंबई, स्कुल ऑफ पोलिटिक्स पुणे,नाईट लॉ कॉलेज मुंबई ची स्थापना केली. ज्यामुळे अनेक विद्यार्थी घडले. स्कुल ऑफ पॉलिटिक्स च्या माध्यमातून संसदीय डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव व्यक्ती आहे,ज्यांच्याकडे 50 हजार पुस्तकं होती.पैकी 30 हजार वाचून टिपण काढलेले होते.त्यासाठी स्वतंत्र घर *’राजगृह’* होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 1918 च्या भारतातील जाती,अनहीलेशन ऑफ कास्ट,शूद्र पूर्वी कोण होते? रानडे,गांधी आणि जीना,थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म,त्यांच्या *द प्रॉब्लेम ऑफ रुपी*’ या ग्रंथावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चा पाया आहे संविधान सह 22 ग्रंथ प्रकाशित आहेत.मूकनायक, बहिष्कृत भारत,जनता ही वृत्तपत्रेही चालविली होती.
7⃣ *बहुजन समाजातील नेते,नाते, नीती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर*:-
कृष्णराव केळुसकर गुरुजी यांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील पहिला मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार कार्यक्रम घेतला.यावेळी केळुसकर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक त्यांना भेट दिले.बाबासाहेब आंबेडकर यांची उच्च शिक्षण घेण्याची जिद्द पाहून त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कडून शिष्यवृत्ती मिळवून दिली.केळुस्कर गुरुजी हे मूळचे कदम आहेत, जे मराठा आहेत.तर सयाजीराव महाराज हे सुद्धा मराठा होत.कोकणात खोती आंदोलन ज्यांनी चालविले ते नारायण नागु पाटील जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शेतकऱ्यांचा नेता घोषित करतात ते ही कुणबी होत.तसेच राजर्षी शाहू महाराज ज्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी प्रचंड आदर आहे.जे त्यांना कोल्हापूर येथून मुंबई येथे डबक चाळीत येवून भेटतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतात. अनेक परिषदात बाबासाहेब यांच्या सोबत सहभागी होतात.
मूकनायक या वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी आर्थिक मदत शाहू महाराज यांनी केली आहे.विदर्भातील डॉ.पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी बनले होते. तर मराठा जातीतील पहिले सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पी.बी. सावंत म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या नाईट लॉ कॉलेज मुळे मला संधी मिळाली.तर भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतांनाच त्यांचा सन्मान म्हणून जगातील पहिला पुतळा 9 मार्च 1950 ला कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभारला.महाड आंदोलनावेळी ज्यावेळी सनातनी लोकांच्या भीतीने कोणीच गावात जागा देत नाही,त्यावेळी एक मुस्लिमच स्वतःचे जमीन जागा उपलब्ध करून देतात.
मौलाना शौकत अली हे लंडन राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुद्द्यावर मदत करतात.संत गाडगेबाबा हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास क्रियेसह पाठिंबा देतात.आपली संपत्ती ही डॉ आंबेडकर यांच्या कार्यासाठी सुपूर्द करण्यासाठी व्यवस्था करतात.सीताराम शिवतरकर,बी जी देवरुखकर, नांकचंद रतु,सुरभानाना टिपणीस ही सर्व मतीची माणसं होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांचा आदर्श घेवून कार्यरत राहिले त्यात शाक्यकुलीन शेतकरी राजपुत्र तथागत गौतम बुद्ध जे कुणबी होते.तर दुसरे आदर्श क्रांतिकारक संत कबीर होत,जे मोमीन आहेत. तर तिसरे आदर्श राष्ट्रपिता आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतीराव फुले होत.जे माळी या जातीतील होत.म्हणजे हे रक्ताचे किंवा जातीचे नसून विचारांचे आदर्श आहेत.जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेबांच्या प्रतिनिधित्वासाठी स्वतः चा राजीनामा देऊन त्यांना निवडून आणतात.
मूकनायक मुखपत्राच्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग असे,
*काय करू आता धारूनिया भीड निःशंक हे तोंड वाजविले*।
तसेच ज्या मनुस्मृति ने छत्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र ठरवून राज्याभिषेक नाकारला होता,त्या अपमानाचा बदला रायगडाच्या पायथ्याशी ती मनुस्मृति दहन करून घेतला. अनेक पत्रांत सर्वातवर ‘जय शिवराय’ घोषवाक्य असायचे. तर राजगृहात शिवरायांची मूर्ती आहे.संत भगवानबाबा यांना ‘नारायणगडाच्या’ वादाबाबत भेट घेतली त्यावेळी कायदेशीर सल्ला दिला.संत भगवान बाबांनी पर्यायी गड निर्माण करून शिक्षण आणि वसतिगृह सोयी,अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सदाचार यासाठी ही कार्य केले.शिवशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात,
*जग बदल घालुनी घाव सांगूनी गेले मज भीमराव!* डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानतात.
तुकोजी होळकर आणि मिस मिलर यांच्या विवाहमुळे होळकर घराण्यात वाद निर्माण झाला होता त्यावेळी सर्वांना एकत्र करून 4 मार्च 1928 ला त्यांच्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समेट घडवून आणली. तसेच मातंग,चर्मकार जाती परिषदा घेवून त्यांतून त्यांच्या हक्क अधिकाराची लढाईचे नेतृत्व केले.ओबीसी ही ओळख 1928ला सायमन कमिशन ला दिलेल्या मेमोरंडम मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली.1926 ला
*”देशाचे दुष्मन”* या पुस्तकाविरोधात कोर्टात लढण्यासाठी मा.जेधे ,जवळकर या नेत्यांना डॉ आंबेडकर मदत करतात.कोर्टात युक्तिवाद करून केस जिंकून देतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानामध्ये देशातील सर्वात मोठा भाऊ ओबीसी साठी अगोदर तरतूद केली कलम 340 ,त्यानंतर कलम 341ला अस्पृश्यासाठी (अ जा SC )साठी ज्यात देशातील 1500 जातींना एकत्र करून अनुक्रम दिला.आणि त्यानंतर अनुसूचित जमातीच्या बांधवासाठी कलम 342 मध्ये प्रतिनिधित्व तरतुदी केल्या.सोबतच 5वी आणि 6वी अनुसूचीही ST साठी जोडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचारधारा सामाजिक आणि राजकीय आंदोलनातून भारतभर घेवून जाण्याचा आपण सर्व प्रयत्न करुया हेच अभिवादन असेल
✒️रामेश्वर तिरमुखे, अंबड,जि.जालना(9420705653)
ramtrimukhe@gmail.com