Home महाराष्ट्र …तेही आपलेच भाऊबंद आहेत की हो!

…तेही आपलेच भाऊबंद आहेत की हो!

189

(जागतिक विकलांग दिवस सप्ताह विशेष)

इ.स.१९९२पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे. दीव्यांग व्यक्ती कुणाला ओझे न ठरता ती स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावी. तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये. यासाठी जागतिक स्तरावरील आरोग्य संघटना प्रयत्नशील व कार्यप्रवन रहावी म्हणून तीला हा प्रेरणादायी दिवस ठरवून देण्यात आला आहे. या दिवसाची सर्वांना माहिती होऊन त्यांनी दिव्यांगांची परवड थांबवली पाहिजे. यास्तव हा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा मार्गदर्शक लेख वाचकांच्या सेवेत… संपादक.

दिव्यांगत्व अर्थात अपंगत्व हे संयुक्त राष्ट्रांच्या सहस्त्रकीय प्रगती योजनांतील एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असून इ.स.२०१५ सालापर्यंत या समस्येवर सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी इ.स.१९९२पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अपंगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन १९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना त्यांच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते. दशकअखेरीस ३ डिसेंबरची निवड झाली आणि सन १९९२मध्ये पहिला दिव्यांग दिन साजरा झाला होता.

मित्रांनो, ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती करून घेऊ. या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये एक धागा समान आहे. या व्यक्तींनी शारीरिक व्याधींवर मात करून स्वत:चे सामर्थ्य सिद्ध करून दाखवले आहे. वॉल्ट डिस्ने, ग्रॅहम बेल, एडिसन, आइनस्टाइन आदिंचे जीवनकार्य बघता त्यांना व्याधी होती, यावर आपला विश्वासच बसणार नाही. पण ध्येय समोर असेल, ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपण जे काही करत आहोत त्यावर निष्ठा असेल, तर कुठलेही काम असाध्य नाही. यापैकीच काहींची थोडक्यात माहिती-

१) लुईस ब्रेल: वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश पसरवला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे. २) सुधा चंद्रन: एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. आणि नुसतीच उभी न राहता तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली. ३) हेलन केलर: सन १८८० साली जन्मलेल्या हेलन केलर यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या कोसळली. यापकी कोणतेही एक अपंगत्वसुद्धा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते. परंतु या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले उच्चशिक्षण डोंगराएवढ्या अडचणींना तोंड देत पूर्ण केले. हेलन अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या. ४) ऑस्कर पिस्टोरियस: पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा दक्षिण अफ्रिकेचा ब्लेड रनर-धावपटू. हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित १००, २०० व ४०० मीटर दौडमधील सुवर्णपदक विजेता आहेच, शिवाय सन २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत ४०० मीटर स्पर्धेसाठी पात्र ठरून आपण अव्यंग लोकांपेक्षा कमी नाही, हेही सिद्ध केले. ५) स्टीफन हॉकिंग: या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला. ६) मन्सूर अली खान: टायगर पतौडी यांनी कार अपघातात आपला उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर कप्तानपदाची धुराही सांभाळली. केवळ एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक आणि “भरवशाचा फलंदाज” असा लौकिकही मिळवला. ७) बी.एस.चंद्रशेखर: भारतीय क्रिकेटला परदेशात विजयाची चटक लावणारी चंद्रशेखर- बेदी- प्रसन्ना- वेंकटराघवन् ही फिरकी गोलंदाजांची चौकडी सर्वपरिचित आहेच. यातील चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. त्यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.

आज जगातली दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच सुमारे ६५ कोटी लोक या ना त्या रूपाने विकलांग आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील अशा बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील आहे. त्यासाठी विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जातात.

हा दिवस साजरा करताना महत्त्वाच्या पायऱ्या लक्षात घ्यायला हव्यात- शाळा, कॉलेजस्, सरकारी, खाजगी व निमसरकारी संस्थांतर्फे आयोजित उपक्रमात सहभागी होणे, विविध प्रचार मोहिमा आयोजित करून अपंगांच्या प्रश्नांना वाचा फोडणे व त्यांना सहकार्याचे अभिवचन देणे, विकलांग बांधवांच्या ठायी असलेल्या छुप्या कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी उत्सव, शिबीरे किंवा मेळावे भरविणे आणि त्यांची जगण्याची उभारी वाढविणे, दिव्यांगांच्या उद्धारासाठी जागतिक स्तरांवरची नियमावली कटाक्षाने पाळली जात नसेल तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षता घेऊन ते मार्गी लावणे. दिव्यांग म्हणजेच ज्याचे अंग दिव्य सोसत आहे अर्थात शरीर अधू झालेले आहे. त्यालाच विकलांग किंवा अपंग असेही म्हटले जाते. लोक त्यांना संबंधित अवयवहीन म्हणून चिडवतात. जसे की आंधळा, पांगळा, लंगडा, हेकणा, चकणा, बहिरा, मुका, थुटा, बुटका, नकटा, चपटा, आदी शब्द योजून त्यास अपमानास्पद वागणूक दिली जाते. यातील काही शारीरिक व्यंग हे जन्मजात असतात. तर काही अपघाताने झालेले असतात.

ते काहीही असले तरी दिव्यांग व्यक्तींनाही स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून शासनासह लोकांनीही त्याचे शिक्षण, भरणपोषण, चलनवलन, मनोरंजन, आवागमन, आवडनिवड, छंद, आदींची पूर्तता केली पाहिजे. त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन जीवन संपवू शकतील अशाप्रकारचे व्यंगावर जोर देऊन किंवा चिडवून बोलणे सामान्य लोकांनी टाळलेच पाहिजे. या आंतरराष्ट्रीय दिनाच्या माध्यमातून त्यांना जीवन जगण्यास बळ आणि नवी उमेद मिळावी, हाच शुद्ध सात्विक हेतू यामागील आहे.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे जागतिक दिव्यांग दिनाच्या समस्त दिव्यांग बंधुभगिनींना आठवडाभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली, मधुभाष- ९४२३७१४८८३

इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here