🔹”सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य अन नवा आनंद:-राहुल डोंगरे
🔸म रा प महामंडळाच्या विभागीय आगारात “सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमात प्रतिपादन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा(दि.30नोव्हेंबर):-आपल्या आयुष्याचा बहुमोल कालावधी जो आपण आपल्या कर्तव्याच्या,कामाच्या ठिकाणी घालवितो आणि मग वयाची अठ्ठावन किंवा साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या कामाच्या नियमांनुसार आपण आपले कार्य करण्याचे थांबवितो, यालाच विशेष करून”निवृत्ती”असे म्हटले जाते.निवृत्ती हा आयुष्याचा पूर्णविराम नसून,”यंग सिनिअर्स”म्हणून धमाल करण्याची काही वर्षे आहेत आणि खरोखरच अशा दृष्टीकोणातूनच आपण सर्वांनी त्याच्याकडे पाहणं आजच्या काळात सगळ्यात जास्त आवश्यक आहे.
यास्तव “सेवानिवृत्ती”म्हणजे नवीन आयुष्य अन नवा आनंद असतो,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रबोधक राहुल डोंगरे यांनी केले.ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळा भंडारा येथे “सेवानिवृत्ती निरोप -सत्कार समारंभ “कार्यक्रमात विशेष अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यंत्र अभियंता (चा.) श्री. नेवारे साहेब हे होते. मंचावर श्री दिवसे साहेब उपयंत्र अभियंता विभागीय कार्यशाळा, श्रीमती बोपचे /पुंडे विभागीय भांडार अधिकारी, सत्कार मुर्ती विलास मानापुरे -कारागीर ” क” ,दीनदयाल शरणागत-समयपाल उपस्थित होते.
सर्वप्रथम सत्कारमूर्ती विलास मानापुरे,दीनदयाल शरणागत यांचा स्मृतीचिन्ह ,शाल-श्रीफळ,इतर भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती दीनदयाल शरणागत म्हणाले की,महाराष्ट्र परिवहन मंडळात नोकरी करतांना मी विश्वस्त म्हणून काम केले.प्रामाणिक हा गुण जोपासला.प्रवासांच्या प्रेमामुळे जीवन जगण्याची ऊर्जा मिळाली.सहकाऱ्यांनी व अधिकारी वर्गानी व वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले,त्यातून बरंच काही नवं-नवीन गोष्टी शिकत्या आल्या.त्यांच्या ऋणातून मी मुक्त होणार नाही असे भावनिक उदगार यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी अध्यक्ष पदावरून यंत्र अभियंता श्री नेवारे म्हणाले की,निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून मिळणारी विश्रांती, जबाबदारीतुन सुटका करणारी एक प्रकारची खूप मोठी सुट्टी असते.तेव्हा जीवनाचं खरं आनंद “सेवानिवृत्ती”मंडळीनी लुटावं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन महेंद्र मोरे यांनी केले,तर आभार राष्ट्रपाल सरादे यांनी केले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी तथा कर्मचारी तसेच यांत्रिक कर्मचारी यांनी सुद्धा सुदृढ आयुष्याचा सत्कार मूर्तींना मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्या.