🔹’समता पर्व’ अंतर्गत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम
✒️लातूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
लातूर(दि.30नोव्हेंबर):- संविधानाची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिन ते ६ डिसेंबर २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर पत्रकारासाठी कार्य शाळेचे तसेच पत्रकार बांधवांसाठी २९ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर पत्रकारासाठी जिल्हास्तरावर कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्राचे अध्यक्ष प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, प्रमुख अतिथी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील तर उदघाटक म्हणून उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पाटील होते. आपल्या व्याख्यानात पाटील यांनी पत्रकारितेविषयी सखोल मार्गदर्शन केले तर युवराज पाटील यांनी समाजाला बदल हवा आहे आणि तो बदल पत्रकारितेमुळे होऊ शकतो. तसेच पत्रकार दत्तात्रय परळकर, मासूम खान यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणाले की, अशा कार्यशाळेतून नवीन विषय समोर येतात त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देता येतो. संविधानविषयक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात येईल. ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम, सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वाटप, बक्षिस वितरण व समता पर्वाचा समारोप कार्यक्रम होणार असल्याचे श्री. चिकुर्ते यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. शेवटी आभार संदीप शिंदे यांनी मानले या कार्यशाळेसाठी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.