🔹राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे विचार आजही प्रेरणादायीच !… – पी.डी.पाटील सर
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगांव(दि. २८ नोव्हेंबर):-सोमवार रोजी शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील कु.सोनाली रविंद्र पाटील, कु.चेतना संजय जावरे, कु. कोमल कैलास भोई यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडला व त्यांच्या जीवनातील निवडक प्रेरणादायी प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पी. डी.पाटील यांनी तात्यासाहेबांचा जीवनपट सांगून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना उदाहरणासहित सांगितले. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले हे एक उद्योजक, विचारवंत, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, लेखक, पट्टीचे पहेलवान, कृषीतज्ञ, भाषातज्ञ अशा विविध पैलूंविषयी माहिती सांगितली. आजही तात्यासाहेबांचे विचार प्रेरणादायीच आहेत. या समतेच्या विचारांवर बहुजन समाजाने चालले पाहिजे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस.पवार यांनी मुलांना महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्त्री मुक्तीचे आंदोलन विस्तृतपणे सांगितले. खऱ्या अर्थाने स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य तात्यासाहेबांनी केले. आजची महिला देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली हे श्रेय तात्यासाहेब व माईंना जाते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.टी.माळी यांनी तर आभार एस.व्ही. आढावे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.