🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास २५ लाखांची केली घोषणा
🔹मोर्शी तालुक्यातील २४ वरुड तालुक्यातील २३ ग्रामपंचायत निवडणूक!
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.26नोव्हेंबर):- राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील बिनविरोध निवडणूक लढविणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लक्ष रुपये इतका विकास निधी आमदार देवेंद्र भुयार यांनी देण्याची घोषणा केली आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत बक्षिस म्हणून हा निधी देण्यात येणार आहे.
गावामध्ये गावकी भावकी, गटा तटाचे वाद निवडणुकीच्या काळात सुरू होण्याचे प्रकार आजही घडत आहेत. हे प्रकार घडू नये यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघातील ग्राम पंचायतींच्या निवडणूका बिनविरोध होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी ‘माझं गाव, माझा स्वाभिमान’ अभियान हाती घेतले आहे. ग्राम पंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करा २५ लाखांचा निधी मिळवा अशी घोषणा आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केली.
मोर्शी वरुड तालुक्यात ४७ ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या गावातील जेष्ठ, प्रतिष्ठित, जाणकार, व्यक्तींनी एकत्र यावं. त्यातून आपापसातले वाद संघर्ष टाळून विकासाभिमुख निवडणुका होतील याकडे लक्ष द्यावे. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ठरवावं आणि विकास करावा, विकास करणाऱ्या गावांना निधी देण्याची जबाबदार माझी गावातील निवडणुकीत पक्ष बघू नये गाव पातळीवर निर्णय घ्यावा काहीजण ग्राम पंचायतींच्या निवडणुकींना अस्तित्वाची निवडणूक असाही रंग देतात. ते करू नये, आम्हला निवडणूक बिनविरोध करायची नाही अश्या मताचे देखील काहीजण असतात तेथे ग्रामस्थच संबंधित लोकांना त्यांची जागा दाखवतील असेही आमदार देवेंद्र भुयार यावेळी म्हणाले.
गावातील एकोपा एकजूट लोकसहभाग आणि ग्रामविकासासाठी बिनविरोध निवडणूका होणे गरजेचे आहे. गावातील सुज्ञ नागरिक युवकांनी बिनविरोध निवडणुकीसाठी नक्की प्रयत्न करावा. स्थानिकांच्या इच्छाशक्तीतून गावचा कायापालट करणाऱ्या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी हा २५ लाखाचा बक्षिसाचा निधी दिला जाणार आहे. ग्राम पंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी अनेक गाव पुढे येतील असा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला.
वरुड मोर्शी तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुका गावपातळीवर असल्याने त्याच्या धुरळा गावातील प्रत्येक घरात उडणार असून गावामध्ये हेवे-दावे विरहित, ग्रामस्थांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसणार आहेत. गावाच्या एकीद्वारे घेण्यात आलेल्या निवडणुका म्हणजे ‘गाव करील, ते राव काय करील’ ही म्हण सार्थ ठरविण्याऱ्या या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणा-या ठरतील. त्यामुळे हेवेदावे विरहित बिनविरोध निवडणुका कराव्यात”, असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. त्यामुळे हेवे-दावे विरहित, बिनविरोध निवडणुका विविध गावांतील ग्रामस्थांनी केल्या तर त्यागावांना स्थानिक विकास निधीमधून 25 लक्ष रुपये विकासात्मक निधी उपलब्ध करुन देेेणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
पाळा ग्राम पंचायतीला उपलब्ध करून दिला ६७ लाखाचा निधी !मागील वर्षी झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास २५ लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते त्याला प्रतिसाद देत मोर्शी तालुक्यातील पाळा गावाने एकत्र येऊन ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिलेला शब्द पाळून पाळा ग्राम पंचायतीला २५ लाखाऐवजी ६७ लाख रुपये सभागृह व गोडाऊन बांधकामासाठी उपलब्ध करून दिला आहे .
वरुड व मोर्शी तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतींच्या निवडणूक होऊ घातल्या आहे माझ्या स्वतःच्या गव्हानकुंड गावात सुद्धा निवडणूक लागली आहे त्या गावातील सर्व पक्षांच्या प्रमुखांना सामाजिक कार्यकर्त्यांना युवकांना मी आवाहन केलेले आहे की आपल्या गावातील ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करा निवडणुकीमध्ये होणारा पैशाचा अपव्यय टाळा, आपसी मतभेद मनभेद विसरून एकोप्याने गावात नांदा ज्या गावातील ग्राम पंचायत बिनविरोध होईल त्या गावाला माझ्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देणार आहे — आमदार देवेंद्र भुयार मोर्शी विधानसभा.