Home चंद्रपूर बोलीचा नाद : डंके की चोट पर

बोलीचा नाद : डंके की चोट पर

273

मानवी जीवनात भाषेला अनन्य साधारण महत्व असले तरी प्रमाणाच्या अतिरेकी अट्टाहासापायी , तिला जन्म देणाऱ्या बोलीला कुचकामी आणि गावंढळ समजून दुर्लक्षित करणाऱ्यांना आज नवा अध्याय मिळाला . त्यासाठी पार्श्वभूमी आहे हरिश्चंद्राची मेहनत आज फळाला आली . ‘राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आणि झाडीबोलीच्या उत्थानासाठी जीवाचे रान करणाऱ्या शोधमहर्षिला करावी लागणारी तपश्चर्या धन्य झाली .

गेल्या अनेक वर्षांपासून बोलीचा गड राखण्यासाठी एकाकी झुंज देताना डॉ. बोरकरांना कित्येक टिकेला तोंड द्यावे लागले असेल , याची कल्पना न केलेली बरी . याचा अनुभव आजही येत आहे त्याची प्रचिती मला तरी कित्येकदा आली . काय भाषा आहे ? किती गावठिपणे लिहितो ? प्रमाणभाषेची बरोबरी करू शकते का ? इतकेच नव्हे तर टर उडवणाऱ्या शेकडो टिपण्या क्षणोक्षणी वाट्याला आल्या . पण या बोलीच्या संस्कृतीला अनन्य साधारण आहे आणि राहील हे पुन्हा एकदा डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे .
संपूर्ण भारत देशभरातून झाडीबोलीत लिहिणाऱ्या आणि झाडीबोलीच्या संस्कृतीला उजागर करणाऱ्या डॉ. बोरकरांना *राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी* पुरस्कार हेच टिकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे .

भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम असले तरी त्यात उच्च निच्च असा दुवा नसते . प्रत्येक भाषेचे स्वतंत्र विज्ञान असते ,तसेच तिला जन्म देणाऱ्या बोलीची स्वतःची अस्मिता असते . ती अस्मिता जपली तरच भारताचा खरा सांस्कृतिक वारसा जगापुढे येईल . याची जाण असल्याने राष्ट्रीय स्तरावर हरिश्चंद्राची फॅक्टरी आपला पेटंट बावनकशी ठरवून गेली . पण या मायेच्या कुशीत जे लहानाचे मोठे झाले , त्यांनाच आपल्या दुधाचे सुतक व्हावे यापेक्षा जगातील मोठी शोकांतिका कोणती ?
इतिहास घडवायचा असेल तर मातीचा इतिहास मशागत करून नव्या पराक्रमाची रोपे उगवायची ताकत डॉ. हरिश्चंद्र बोरकर नव्या पिढीत भरत आहेत . पण भाषिक आतांकवादाला बळी पडलेली विद्वान मंडळी बोलीला न्यूनगंडाच्या सावलीत ढकलून अंकुराची वाढ खुंटवत असले , तरी डॉ .बोरकरांचा सुर्यतेज त्याला वटवृक्षात वाढवायला सज्ज झाला आहे . झाडीबोलीच्या वटवृक्षाची मातीत रुजलेली मूळे गर्भात दडलेला रस घेऊन भाषेला संजीवन प्राणवायू बहाल करेल , हेच चिरकाल सत्य आहे . म्हणून आज बोलीचा नाद – डंके की चोट पे , म्हणायला आज मला अभिमान वाटतो आहे . झाडीचा झेंडा असाच चिरंतर यशोशिखरावर डौलाने फडकत राहणार आहे . त्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी .

झाडीबोली शोधमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी फेलोशिप घोषित झाल्यामुळे आम्हाला नवा ऊर्जा व स्फूर्ती प्राप्त झाली असून , डॉ . बोरकरांचे आयुष्य अशा अनेक पुरस्कार रत्नांनी उजळून निघावेत या प्रांजळ वंदनेसह हार्दिक शुभेच्छा देऊन , त्यांना दीर्घायुष्य लाभून झाडीचा मेवा भारतवर्षाला अखंड चाखायला मिळो , अशी निर्मिकाकडे मनीषा व्यक्त करतो .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनसुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

श्रद्धा के गिद्ध-भोज के लिए जुटान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here