✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)
गेवराई(दि.25नोव्हेंबर):- तालुक्यातील तलवाडा व गेवराई येथील पोलिस ठाण्यात अधिक काळ नौकरी केलेले आणि सध्या निवृत्त झालेले पोलिस कर्मचारी नामदेव फड यांचा मुलगा डॉ.प्रविण फड यांची सन २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय ( ASO ) तसेच राज्य विक्रीकर निरीक्षक ( STI ) या दोन्ही पदांसाठी एकाच वेळी थेट निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व वर्गमित्र यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ.प्रविण नामदेव फड हे सध्या वैद्यकीय व्यवसाय करून रूग्णांची सेवा करत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यांची वर्ग २ पदासाठी थेट निवड झाल्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक करून त्यांनी अथक परिश्रमातून मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तलवाडा व परिसरातील एकूण चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले आहे.
यामध्ये तलवाडा येथील डॉ.प्रविण नामदेव फड आणि दिपक दत्तात्रय देशमुख यांची राज्य विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय या दोन्ही पदांसाठी एकाच वेळी निवड झाली आहे तर भोगलगाव येथील प्रा.चंद्रकांत पुरी यांचा मुलगा वैभव पुरी व राजापूर येथील शेख अजीज शेख अमीन या दोघांची राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. या चारही युवकांनी आपलं गाव व गेवराई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून या यशाबद्दल त्यांचे आणि त्यांच्या आई-वडीलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.