2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या भारतीय संविधानाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी विधी मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटना सादर केली व भारताच्या नव्या प्रकाशमय युगाला सुरुवात झाली. भारतातील लोकांच्या भावभावना, आशा, आकांक्षा पल्लवीत झाल्या. हाच तो दिवस म्हणजे संविधान दिवस होय. भारतात लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये संविधान सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण संविधानातील सर्वमान्य कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. त्यामुळे भारतीय संविधान आपले श्रेष्ठत्व दर्शविते. भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहे. यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक अधिकार, धार्मिक अधिकार, शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार या सर्वांचा समावेश होतो. आणि हेच अधिकार आपल्या भारतीय संविधानाची विशेषतः दर्शविते. कारण लोकशाही देशांमध्ये लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करणे हाच उद्देश मूळ असतो.
भारतीय संविधानातील तरतुदीमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर जर गदा येत असेल तर असे राज्यांनी केलेले कायदे न्यायप्रक्रियेतून रद्द केले जातात. कारण भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेकडे सोपविण्यात आली आहे. त्यासाठी भारत देशात उच्च व सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आहे. सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त झाले आहे. कुणी व्यक्ती सर्वोच्च पदाने, संपत्तीने, प्रसिद्धीने, कलेने कितीही मोठा असला तरी तो व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही .
भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिक आपले मत स्वइच्छेने मांडू शकतो ,स्वइच्छेने लिखाण करू शकतो. धार्मिक स्वातंत्र्यामुळे प्रत्येक धर्मातील व्यक्तीला आपल्या धर्माची उपासना करण्याची मुभा बहाल करण्यात आली आहे. म्हणून सर्वधर्म समावेशक समाज आज आपल्या देशात टिकून आहे. आणि यामुळे भारत देश जगात या वैविध्यतेमुळे एक आपले वेगळे स्थान दर्शवितो. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधान दिवस हा आपला एक उत्सव म्हणून साजरा करावा व संविधानाप्रती आपली असलेली निष्ठा जपावी. भारत देश हा एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो. कारण भारतात प्रत्येक नागरिकास कोणत्याही धर्माचे आचरण करण्याची मुभा संविधानाने बहाल केलेली आहे. धर्माच्या नावावर उच्च नीच असा भेदभाव न करता आपण सर्व समान आहोत ही भावना संविधान शिकविते. लोकशाहीमध्ये म्हणून प्रत्येक जाती धर्माला आपले स्थान मिळाले आहे मग तो सत्तेत वाटा असो की, सरकारी नोकरीत सहभाग असो ही सर्व संविधानाची देण आहे, भारत देशाची राजसत्तेची चावी ही जनता जनार्दनाच्या हाती आहे. कारण सर्व अधिकार हे जनतेच्या हातात आहे.
*एक व्यक्ती- एक मत* ही डॉक्टर आंबेडकरांची सर्वोत्तम असलेली देन मतदानाच्या रूपाने एक शस्त्र म्हणून प्रत्येक जनता वापरू शकते. त्यामुळे हे शस्त्र जनतेच्या हातात असल्याने विशिष्ट वर्गाचा पगडा फार काळ टिकाव धरत नाही. मोठमोठे सरकार कोसळण्याची भीती जनतेच्या या एका शस्त्रामुळे असते. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. देशाला संघटित व एकत्रित करण्यासाठी, प्रजासत्ता करण्यासाठी डॉ आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. मूलभूत अधिकाराबरोबरच संविधानामध्ये काही कर्तव्य सुद्धा सांगितलेली आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे, देशाचे सार्वभौमत्व राखणे, घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आदींचा समावेश होतो. राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यतेचा कलंक नष्ट केला आहे. या कलमानुसार अस्पृश्यता मानणे उच नीच मानणे कायद्याने गुन्हा आहे. राज्यघटनेतील कलम 32 हा घटनेचा आत्मा आहे कारण, त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे हनन होत असेल तर ती व्यक्ती कोर्टात जाऊन *जनहित याचिका* दाखल करू शकते त्यामुळे कलम 32 ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे . भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, सर्वधर्मसमभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन ,पर्यावरण विषयक जान, हिंदू कोड बिलासारखे विषय इत्यादी सारख्या असंख्य विषयावर प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे भारतीय संविधान जगात प्रसिद्ध आहे.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने डॉ आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला समोर ठेवून डॉक्टर आंबेडकरांना मानद *डॉक्टर ऑफ लॉज* ही पदवी बहाल केली आहे. आज संविधान दिवस. जर आपण सर्वांनी संविधानाचा अभ्यास करून त्याचे संरक्षण केले तर संविधान सुद्धा आपले संरक्षण करेल. येणाऱ्या पिढीसमोर आपण एक आदर्श निर्माण करूया.व संविधान हाच सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे ही भूमिका सर्व समाज कल्याणासाठी व्यक्तिव्यक्ती मध्ये रुजवूया.तेव्हाच आज आपण साजरा करीत असलेला लोकशाहीचा उत्सव म्हणजेच संविधान दिवस नक्कीच फलदायी ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.!!!!!!!
————————————–
✒️श्री अविनाश अशोक गंजीवाले(सहा शिक्षक)जि प प्राथमिक शाळा करजगाव पं स तिवसा जि अमरावती