✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.24नोव्हेंबर):-संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने येथील संविधान चौकात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी 73 वा संविधान सन्मान दिनाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिमुर शहरातील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते बाईक रॅली काढणार आहेत.
दुपारी 2 वाजता संविधान सन्मान दिन समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांचे अध्यक्षतेखाली मुख्य मार्गदर्शनांचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी “जनसामान्य नागरिकांच्या जीवनातील परिवर्तनाचा जाहीरनामा-भारतीय संविधान” या विषयावर भारतीय संविधानाचे अभ्यासक अधिवक्ता भुपेंद्र रायपुरे व “भारताच्या संविधानाचे रक्षण हे भारतीय नागरिकांची जबाबदारी” हा विषय सामाजिक कार्यकर्ते संजय बोधे आपल्या मार्गदर्शनात मांडणी करणार आहेत.
या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, ठाणेदार मनोज गभने, नगर परिषदच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी आशीष फुलके यांना निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.