(सत्य साईबाबा जयंती)
शिर्डीच्या साईबाबांचे अवतार मानले जाणारे सत्य साई बाबा यांची यंदा ९७वी जयंती आहे. त्या निमित्त पुट्टपर्थीमध्ये उत्साहपूर्ण रंगतो सोहळा. जाणून घ्या त्यांना का म्हणतात शिर्डीच्या साईंबाबाचा अवतार? त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याशी निगडित काही खास गोष्टी आपण बापू- श्रीकृष्णदास निरंकारीजीं यांच्या लेखणीतून पाहणार आहोत… संपादक.
शिर्डीच्या साईबाबांचे अवतार मानले जाणारे सत्य साईबाबा यांची यंदा ९६वी जयंती आहे. दि.२३ नोव्हेंबर १९२६ रोजी त्यांचा पुट्टपर्थी या शहरात जन्म झाला. दरवर्षी त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त पुट्टपर्थी शहरात तसेच जगभरातील अनेक ठिकाणी त्यांचे भक्त हा आनंद साजरा करतात. यंदा सुद्धा पारंपरिक रथोत्सव आणि वीणा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असेलच. २३ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचा समारोप मंत्री महोदयांच्या हस्ते होत असतो. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःला साईबाबांचे अवतार म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आपल्या अनुयायांचा मोठा वर्ग निर्माण करून त्यांनाही हाच विश्वास पटवून दिला होता. आपल्या हयातीत त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करून जगातील १२६ देशांमध्ये बाराशे सत्य साईबाबा केंद्र स्थापन करण्याचे मोठे काम केले आहे.
सत्य साईबाबा यांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केल्याचे म्हंटले जाते. म्हणूनच त्यांना काही वेळा सुपर ह्युमन म्हणून देखील संबोधले जात होते. लोकांमध्ये फिरताना आपले चमत्कार दाखवत. कधी बहुमूल्य हार, अंगठी, दागिने किंवा अंगारा असे सगळे जादुई पद्धतीने प्रस्तुत करणे अनेकदा चर्चेच्या गर्तेत आले होते. यावरूनच त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला होता. सन १९४४मध्ये सत्य साईबाबा यांनी पुट्टपर्थी येथील गावकऱ्यांसाठी एका मंदिराची उभारणी केली. आध्यात्मिक बाबींच्या सोबतच सामाजिक कार्यात देखील सत्य साई बाबांचा मोलाचा वाटा होता. मोफत हॉस्पिटल, क्लिनिक, पाणपोई, ऑडिटोरियम, आश्रम, शाळा इत्यादींची बांधणी करून त्यांचा गोरगरिबांना वापर करायला दिला. त्यामुळे अनेकदा त्यांना देवाचे रूप मानले जात होते.
सत्य साईबाबा यांचे मूळनाव सत्यनारायण राजू असे असून सन १९२६ साली पुट्टपर्थी येथील एका गरीब हिंदू घरात त्यांचा जन्म झाला होता. आई- वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार होता. लोकांच्या म्हणण्यानुसार सत्य साईबाबा यांचा जन्म ढेकळली चमत्कारिक वातावरणात झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी अचानक घरात वाद्य वाजू लागली होती. जेव्हा सत्यनारायण हे तेरा वर्षाचे होते तेव्हा एका विंचवाने त्यांना दंश केला होता. त्यानंतर काही तास ते पूर्णतः कोमात होते. काही तासांनी त्यांना शुद्ध आली. तेव्हा मात्र त्यांचे वर्तन पूर्णतः बदलले होते. त्यांनी अचानक संस्कृतमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली. तर त्यांचे शरीरही आधीपेक्षा किंचित अधिक कठोर झाले होते. या प्रकरणात त्यांच्यावर उपचार करण्यात स्थानिक डॉक्टरांना देखील यश आले नाही, असे म्हटले जाते. या घटनेनंतर एके दिवशी त्यांनी चॉकलेट आणि गुलाबाची फुले अशा भेटवस्तू बनवून वाटण्यास सुरुवात केली.
त्यामुळे यामागील कारण त्यांना विचारण्यात आले. त्यांनी आपण साईबाबांचे अवतार असल्याचे सर्वाना सांगितले. तसेच त्याच क्षणी स्वतःच्या नावापुढे त्यांनी साई हा शब्द देखील जोडून घेतला. लोकांच्या विचारसरणीत सनातन धर्माची विचारधारा समाविष्ट करण्यात त्यांना यश आले होते.
इ.स.१९६३मध्ये सत्य साईबाबा यांना तब्बल चार वेळा हृदयविकाराचे झटके आले होते. मात्र काही काळाने त्यांच्या प्रकृतीमध्ये स्थैर्य आले होते. यानंतर त्यांनी एका प्रवचनातून आपला मृत्यू झाला तरी कर्नाटकात आपण प्रेमा साईंबाबा यांच्या रूपात पुन्हा जन्म घेऊ, असा दावा केला होता. सन २०११ साली मार्चमध्ये सत्य साईबाबा यांना श्वसनात त्रास होऊ लागल्यावर पुट्टपर्थी येथील शांतिग्राम श्री सत्य साई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. यानंतर एकाच महिन्यात त्यांची अवस्था आणखीच बिकट झाली. ते दि.२४ एप्रिल २०११ रोजी वयाच्या ८५व्या वर्षी अनंतात विलीन झाले.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे पावन जयंती पर्वावर त्यांना विनम्र अभिवादन !!
✒️संत चरणधूळ:-बापू- श्रीकृष्णदास निरंकारी(संतसाहित्य व संतचरित्रांचे गाढे अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.
व्हा. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com