✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.19नोव्हेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड चिमूर सावली सिंदेवाही परिसरात अतिवृष्टीमुळे धान व इतर पिकाचे नुकसान झाले. अवघे धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अतिृष्टीतून काही शेतकऱ्यांचे धान पीक कसेबसे बचावले. बचावलेले धान पीक गर्भावस्थेतून परिपक्व बनल्यानंतर कापणीच्या स्थितीत असताना, अस्मानी संकटामुळे धान पिकावर विविध रोगांचे प्रादुर्भाव उद्भवला. पांढरा पेरवा, खोडकिडा आदीं. किडींच्या प्रादुर्भावामुळे धान व इतर पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.
यामुळे 50 ते 60 टक्केपर्यंत धानाला पांढरा लोंब (पांढरा पेरवा) आला आहे. तसेच खोडकिडा या किडींच्या रोगामुळे संपूर्ण धान पीक नेस्तनाबूत झाले आहे, त्यामुळे शेतातील अन्य पिकांवरही या किडींचा प्रादुर्भाव उद्भवला आहे. परिणामी अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानीत अधिक भर पडली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली असून शेतीचे भयंकर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून शेतीसाठी घेतलेले सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे, मुलीचे लग्न, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाचे शिक्षण, शेतमजुरांचे पैसे आदी. यक्ष प्रश्न त्याच्यासमोर आवसून उभे असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व चिमुर तालुक्यातील शेतकरी सततच्या अस्मानी व सुलतानी संकटामुळे पूर्णपणे खचला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द, नान्होरी, नांदगाव, पिंपळगाव, सावलगाव, सोंदरी, नवेगाव, कोथूळना, परसोडी, सुरबोडी, बोरगाव, तोरगाव बुज, देऊळगाव, कोलारी, बेलगाव, चौगान, भालेश्वर, झीलबोडी आदी. गावात पांढरा पेरावा व खोडकीडा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव उद्भवला आहे. तरी याबाबत प्रशासनाने सर्वेक्षण करून पिडीत शेतकऱ्यांना किडीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे मुकेश जीवतोडे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, नर्मदाताई बोरेकर जिल्हा संघटिका चंद्रपूर, आसिफ बागवान संपर्क प्रमुख चिमूर विधानसभा क्षेत्र, अशोक सपकाळ संपर्कप्रमुख ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश वाघ शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक यांच्या मार्फतीने शिवसेना पक्षप्रमुख मान.उद्धवजी ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मान. अंबादास दानवे, शिवसेना उपनेते आमदार भास्कर जाधव यांना मुंबई येथील मातोश्री भवनात पार पडलेल्या एका बैठकीत निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सोबतच पूर्व विदर्भात धान पिकावरील पांढरा पेरवा व खोडकिडा रोगाची माहिती घेतली.
यावेळी मिलिंद भनारे उपजिल्हा प्रमुख ब्रम्हपुरी, केवळरामजी पारधी सरपंच तथा उपतालुका प्रमुख शिवसेना, भोजराज ज्ञानबोनवार तालुकाप्रमुख नागभिड, श्रीहरी सातपुते तालुकाप्रमुख चिमूर, लीलाधर चूधरी तालुकाप्रमुख सावली, राकेश अलोने तालुकाप्रमुख सिंदेवाही, प्रा ज्ञानेश्वर बगमारे गडचिरोली आदीं. शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.