Home गडचिरोली मुंडाराज्य स्थापनेची शपथ घेणारे!

मुंडाराज्य स्थापनेची शपथ घेणारे!

142

(भगवान बिरसा मुंडा जयंती विशेष)

क्रांतिवीर भ.बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली. सन १९०२मध्ये ब्रिटिशांनी छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले. आदिवासींचे हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची ओळख आहे. रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ त्यांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच त्यांच्या स्मृती नेहमी ताज्या रहाव्यात यासाठी रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास त्यांचे नाव देण्यात आले आहे. जयंती निमित्त त्यांच्या जीवनकार्यावर श्री.एन. के.कुमार जी. यांनी प्रकाशझोत टाकला आहे… संपादक.

सन १८५७च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा जमातींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना सरदार म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. तो संघर्ष सरदारी लढाई म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा भगवान बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा जमातींनी त्यांच्यासोबत सरदार आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी चालविलेले व्यापक आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी दोन नियम-अटी लागू केले होते- १) इंग्रजांनी अनेक ठेकेदारांना दारूचे अड्डे चालविण्यासाठी परवाने दिले. अशिक्षित मुंडा आदिवासी नेहमी दारूच्या नशेत राहून ते आंदोलनापासून अलिप्त राहतील, असा त्यांचा हेतू होता. भगवान बिरसांनी या नियमांना विरोध करत इंग्रजांविरुद्ध आवाज उठविला. आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. २) गावागावांत जेवढ्या आदिवासींच्या जमिनी आहेत, त्यांवर सरकारी वनाधिकाऱ्यांचा अधिकार आहे. या नियमामुळे मुंडा लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावला जाऊन समाजाचे नुकसान होणार होते.

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म दि.१५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील सुगना व आई करमी हे होत. जन्म गुरुवारी म्हणजे बिस्युतवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव बिरसा ठेवण्यात आले. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांची आत्या दासकीर हिच्या आयुभातू या गावी गेले. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते. मुंडांना शिक्षणाची खुप आवड होती. सुरुवातीला ते आयुभातूजवळ सलगा गावच्या आश्रमात जात. ते आश्रम जयपाल नाग हा आदिवासी व्यक्ती चालवित होता. पुढे सन १८८६ मध्ये बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणात मुंडा आदिवासींबद्दल ठग, चोर, बेइमान इत्यादी शब्दांचा वापर केला. तेव्हा त्यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले.

त्यामुळे सन १८९० या चौथ्याच वर्षी बिरसांना शाळेतून काढण्यात आले. पुढे त्यांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला. उदरनिर्वाहासाठी ते चार वर्षे बांदगाव येथे वास्तव्यास होते. त्यांचा विवाह हिरीबाई नामक मुलीशी झाला; परंतु अल्प काळातच तिचे निधन झाले. त्यांनी आनंद पांडे या वैष्णव पंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट धर्माची स्थापना केली. यासाठी त्यांनी लोकसंघटन करून मुंडा जमातीत एकता निर्माण केली. ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे, अशी लोकजागृती ते करू लागले. त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.

सन १८९४मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट, इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली. त्यामुळे अनेकांना आपल्या जमिनी सावकार आणि जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरांमुळे तारण ठेवलेल्या जमिनी सोडवून घेणे, त्यांना अशक्य बनले. जमीनमालकी असणारे लोक भूमिहीन व वेठबिगार बनले. त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचे संघटन केले. समाजबांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे. त्यामुळे आपले राज्य येईल, असे ते सांगत. त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामास जाणे बंद केले. इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य कसे आहोत? हे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत. त्यांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने त्यांना बंदी करण्याचे ठरविले. ब्रिटिशांनी दि.२६ ऑगस्ट १८९५ रोजी भ.बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले.

त्या सर्वांच्या अटकेमुळे पुन्हा मुंडा समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर दि.३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसांची सुटका झाली. तुरूंगातून सुटल्यानंतर भगवान बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे पाच हजार आदिवासी समाजबांधव सामील झाले होते. त्यांनी कायद्याची लढाई सोडून दि.२५ डिसेंबर १८९९पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड आदी प्रदेशांतील पोलीस चौक्या जाळण्यात आल्या. या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत उलगुलान असे म्हणतात. या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तिरकामठ्यांद्वारे हजारो पोलीस व त्यांचे सहकारी मारले गेले. अखेर भ.बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला. त्यांना जो कोणी पकडून देईल त्याला इंग्रजांकडून पाचशे रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी भ.बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. त्यामुळे ते दि.३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडू शकले. रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे दि.९ जून १९०० रोजी निधन झाले.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या समाजक्रांतीला मानाचा मुजरा !!

✒️श्री.एन. के.कुमार जी(वैभवशाली भारतीय इतिहासाचे अभ्यासक- विश्लेषक)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.ता. आरमोरी, जि. गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here